शहरातील इंदिरानगर भागात रविवारी दिवसभर मुक्त संचार करून सर्वाना गुंगारा देणाऱ्या बिबटय़ाला सोमवारी पहाटे बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले. एक बिबटय़ा जेरबंद झाल्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी अद्याप परिसरात आणखी एखादा बिबटय़ा असल्याची साशंकता व्यक्त केली जात आहे. हॅलो किड्स शाळेच्या बंगल्यात या बिबटय़ाला पकडण्यात आले.
शहरात बिबटय़ांनी शिरकाव करण्याची ही पहिली घटना नाही. आजवर अनेक भागांत बिबटय़ांनी शिरकाव करून गोंधळ उडवून दिल्याचा इतिहास आहे. यामुळे रविवारी सकाळी जेव्हा इंदिरानगरमध्ये काही जणांना बिबटय़ाचे दर्शन घडले, तेव्हापासून वन विभाग व पोलीस यंत्रणा सतर्क झाली. शास्त्रीनगरमधील गजाननमहाराज मंदिर परिसरात सकाळी व रात्रीच्या सुमारास बिबटय़ा दिसल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. दरम्यानच्या काळात वन विभागाकडून त्याची शोधमोहीम सुरू होती. स्थानिकही यंत्रणेच्या मदतीला धावून आले. पण, जंगजंग पछाडूनही बिबटय़ाचा काही थांगपत्ता लागला नाही. रात्रीच्या शांततेत शोधमोहिमेत बिबटय़ा मंदिरालगतच्या हॅलो किड्स शाळेच्या बंगल्यातील पाण्याच्या हौदात बसलेला आढळून आला. या बंगल्यात बालवाडीचे वर्ग भरतात. तिथे कोणी वास्तव्यास नाही. रात्री अकराच्या सुमारास या ठिकाणी छाननी करण्यात आली होती. परंतु, त्या वेळी बिबटय़ा आढळून आला नाही, असे शाळेच्या संचालिका डॉ. नम्रता राजपूत यांनी सांगितले. पहाटेच्या सुमारास मात्र तो याच बंगल्याच्या आवारात आढळून आला. त्याचा ठावठिकाणा लागल्यावर यंत्रणेने आसपासच्या परिसरात खबरदारीची उपाययोजना केली. कोणी घराबाहेर पडू नये याची तजवीज केली. बिबटय़ाला पकडण्याचा अनुभव असणारे वनक्षेत्रपालसुनील वाडेकर यांना पाचारण करण्यात आले. पहाटे सव्वाचार वाजता त्यांनी ब्लो पाइपच्या सहाय्याने ‘इंजेक्शन’ डागून बिबटय़ाला बेशुद्ध केले. त्यानंतर या बिबटय़ाला पिंजऱ्यात टाकून पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू उद्यानात हलविण्यात आले. तीन ते साडेतीन वर्षांचा असणाऱ्या हा बिबटय़ा मादी असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.
सुनील वाडेकरांचे ‘शतक’
नागरी वसाहतीत शिरलेल्या बिबटय़ांना पकडण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारे वनक्षेत्रपाल सुनील वाडेकर यांनी इंदिरानगर येथे बिबटय़ाला जेरबंद करत १०० बिबटय़ांचा सामना करण्याचे शतक पूर्ण केले आहे. त्यात राज्यातील वेगवेगळ्या भागांत नागरी वस्तीत शिरलेल्या बिबटय़ांची संख्या ५० ते ६० च्या आसपास आहे. बिबटय़ाची कायमस्वरूपी नोंद ठेवण्यासाठी मायक्रोचीप बसविणे, विहिरीत पडलेल्या बिबटय़ांना बाहेर काढणे, बिबटय़ांची आरोग्य तपासणी करून त्यांना जंगलात सोडणे या विविध कामांदरम्यान त्यांनी १०० बिबटय़ांचा सामना केला आहे. त्यात नागरी वसाहतीत शिरलेल्या बिबटय़ाला पकडणे हे काम आव्हानात्मक आहे. जमावाला पाहून बिबटय़ा बिथरतो. समोर दिसेल त्याच्यावर हल्ला चढवितो. अशा प्रसंगात बिबटय़ाला बेशुद्ध करणे अवघड काम असते. बिबटय़ाला बेशुद्ध करण्यासाठी वन विभाग परदेशी बनावटीची ट्रँक्विलायझर गन आणि ब्लो पाइपचा वापर करते. त्याचा नियोजनपूर्वक वापर करून वाडेकरांनी बिबटय़ाला सुरक्षितपणे नागरी वसाहतीतून जेरबंद केले आहे. मागील वर्षी त्यांच्या कामगिरीची दखल घेत वन विभागाने त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित केले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2014 रोजी प्रकाशित
इंदिरानगरमधील बिबटय़ा जेरबंद
शहरातील इंदिरानगर भागात रविवारी दिवसभर मुक्त संचार करून सर्वाना गुंगारा देणाऱ्या बिबटय़ाला सोमवारी पहाटे बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले.
First published on: 01-07-2014 at 07:42 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard martingale in indiranagar