निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात विशेषत्वाने करंजगाव शिवारात वारंवार बिबटय़ांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. मागील आठवडय़ात याच गावात ओम पावशे या चार वर्षांच्या बालकावर बिबटय़ाने हल्ला केला होता. तेव्हापासून करंजगाव व गोदाकाठ परिसरात बिबटय़ाचा वावर कायम असून वन विभागाने पिंजरा लावूनही अद्याप तो जेरबंद झाला नसल्याने शेतात राहणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
करंजगाव परिसरात तीन ते चार बिबटय़ांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून बिबटय़ांच्या भीतीमुळे दिवसाही पिंकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणे ग्रामस्थ टाळू लागले आहेत. तर, शिवारात राहणाऱ्यांनी अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे बंद केले आहे. दिवाळीच्या धामधुमीतही करंजगाव शिवारात बिबटय़ाच्या भीतीने अघोषित संचारबंदी असल्यागत परिस्थिती होती. सिन्नर वनविभागाने गावातील पावशे वस्ती आणि भुसे येथे पिंजरा लावला आहे. वन विभागाने परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. करंजगाव परिसरात प्रचंड ऊस क्षेत्र असल्याने बिबटय़ाला लपण्यासाठी आयतीच जागा निर्माण होते. बिबटय़ांनी अनेक कुत्री, बकरी यांचा फडशा पाडला असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपालिका सदस्य सागर जाधव यांनी केली आहे.