मुंबईच्या ‘जीवनवाहिन्या’ समजल्या जाणाऱ्या लोकल आणि बेस्ट बसमध्ये ‘बेटी झिंदाबाद’चा नारा घुमणार आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे घटलेले प्रमाण आणि महिलांची सुरक्षितता या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर सर्वसामान्यांमध्ये जागृती घडवून आणण्याच्या दृष्टीने ‘अॅक्शन एड’ या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
बेस्टच्या जवळपास दीड हजार गाडय़ा मुंबईच्या रस्त्यांवर धावतात. रेल्वे तर मुंबईकरांची जीवनवाहिनीच समजली जाते. लाखो मुंबईकरांचा दैनंदिन प्रवासाच्या निमित्ताने या दोन व्यवस्थांशी दररोज संबंध येत असतो. म्हणून ‘अॅक्शन एड’ने या दोन व्यवस्थांची निवड केली आहे.
पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट असा प्रवास करणाऱ्या तब्बल ४५ लाख प्रवाशांपर्यंत आपला संदेश ‘अॅक्शन एड’ पोहोचविणार आहे. तर बसगाडय़ांमध्ये संस्थेने हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत तयार केलेली एक फिल्म दाखविण्यात येणार आहे. बसने प्रवास करणाऱ्या सुमारे १५ लाख प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा आमचा विचार असल्याचे संस्थेच्या निर्मला नाथन यांनी सांगितले. तब्बल महिनाभर हा उपक्रम रेल्वे आणि बसगाडय़ांमध्ये राबविला जाईल. २०११च्या जनगणनेनुसार भारतात प्रत्येक एक हजार मुलांमागे केवळ ९१९ मुली आहेत.
मुलांच्या तुलनेत मुलींचे हे घटलेले प्रमाण धक्कादायक आहे. मुलामुलींचे हे विषम प्रमाण समाजव्यवस्थेची घडी विस्कटणारे ठरू शकते. स्त्रीला दुय्यम समजण्याच्या समाजाच्या मानसिकतेत या विषमतेचे मूळ आहे. ही मानसिकता बदलण्याचे काम या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2013 रोजी प्रकाशित
‘जीवनवाहिन्यां’मध्ये ‘बेटी झिंदाबाद!’
मुंबईच्या ‘जीवनवाहिन्या’ समजल्या जाणाऱ्या लोकल आणि बेस्ट बसमध्ये ‘बेटी झिंदाबाद’चा नारा घुमणार आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे घटलेले प्रमाण आणि महिलांची
First published on: 11-12-2013 at 07:49 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local railway set to ecoh girl child zindabad