वाई शहर व परिसरात गणरायाची जल्लोषात मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी तरुण डॉल्बी व ढोल ताशांच्या तालावर बेधुंदपणे नाचून आपला आनंद साजरा करत होते.
सकाळपासूनच घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती नेण्यासाठी बाजारपेठेत आबालवृद्धांनी गर्दी केली होती. दाणेबाजार गणेशोत्सव मंडळ, शिवदत्त गणेशोत्सव मंडळ, काशी कापडी गणेशोत्सव मंडळ, शेषशाही गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ, बाल विकास गणेशोत्सव मंडळ शहाबाग, वीज वितरण कंपनी, पोलीस वसाहत आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून गुलालाची उधळण करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत, डॉल्बी व ढोल ताशाच्या गजरात बेधुंद नाचत गणरायाच्या आगमनाचा उत्सव साजरा केला. श्रींच्या मिरवणुकीत तरुणांबरोबरच, लहान मुले-मुली व वृद्धही भगव्या रंगाच्या टोप्या व डोक्यास रिबिन बांधून आनंदाने सहभागी झालेले दिसत होते. सायंकाळी आलेल्या रिमझिम पावसातही तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चांदीच्या रथातून, सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून, हातगाडीवरून मिरवणुका काढून गणेशाची प्रतिष्ठापना करून आपला आनंद द्विगुणित केला.
वाई शहरात ११० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली तर वाई पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावामधून ११७ मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. तालुक्यात एक गाव एक गणपती योजना ३३ गावांमध्ये राबविण्यात आली. यामध्ये बोरगाव, कडेगाव, व्याहळी पुनर्वसन, शेलारवाडी, एकसर, वयगाव, गोळेवाडी, जोर, नांदगणे, कोंढवली, बलकवडी, परतवडी, आकोशी आदी गावांचा समावेश आहे. याशिवाय घरोघरी गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या नेतृत्वाखाली, एक एसआरपी प्लाटून, ३७ होमगार्ड व पोलीस कर्मचारी असा एकूण ११० कर्मचाऱ्यांनी शहरात व परिसरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवला आहे.