गैरव्यवहार, घोटाळे, बेकायदा ठराव, मनमानी व त्यातून शेकडो कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रचंड डोंगर महापालिकेवर असताना व घोटाळ्याच्या गुन्ह्य़ात आ. सुरेश जैन हे सुमारे दीड वर्षांपासून तुरुंगात असताना महापालिकेच्या निवडणूक प्रचारात ‘काय गुन्हा होता या धुरिणांचा?’ असा प्रश्न जैन यांच्या सत्ताधारी आघाडीकडून विचारला जात आहे.
आ. सुरेश जैन यांच्या छायाचित्रासह करण्यात येणारा ‘काय गुन्हा होता या धुरिणांचा?’ हा प्रचार सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. गरिबांना पक्की घरे देणे आणि शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे स्वप्न पाहणे गुन्हा आहे काय, असे प्रश्न त्यात जळगावच्या मतदारांनाच विचारण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागांत एकूण किती झोपडय़ा होत्या, त्यातून किती लोक राहात होते, त्या वस्त्यांना समस्यांनी कसा विळखा घातला होता हे स्पष्ट करतानाच पालिकेने घरकुल योजना राबवून किती घरे बांधली व त्याचा लाभ किती लोकांना झाला हे खान्देश विकास आघाडीने स्पष्ट केले आहे. पालिकेने एकूण किती घरांचे उद्दिष्ट ठेवले होते, त्यातील पूर्ण किती, पूर्णत्वाच्या मार्गावर किती व अपूर्णावस्थेत किती याचीही माहिती आघाडीने दिली. यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते काही वर्षे नियमित होते, परंतु पुढे भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांनीच घरकुल योजनेचे काम थांबविले आणि कर्जफेडही तेव्हापासूनच थांबल्याचे आघाडीचे म्हणणे आहे.
त्यामुळे घरकुल योजना बंद पडली. नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी कर्जफेडही थांबविली, असा आरोप खान्देश विकास आघाडीकडून करण्यात येत असला तरी अपहार, घरकुल योजनेतील गैरव्यवहार, आक्षेप, बेकायदा ठराव, मक्तेदारांना कोटय़वधी रुपये आगाऊ व बिनव्याजी देणे याला सर्वस्वी जबाबदार कोण, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुरेश जैन यांनी शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशातून घरकुल योजना राबविली, मात्र गैरव्यवहारांमुळे ती राज्यात गाजली. दोन चौकशी समित्यांचा अहवाल, महालेखापरीक्षकांचा ठपका, त्यातून घोटाळ्याचा गुन्हा पोलिसांत दाखल होणे, सुरेश जैन व तत्कालीन पालकमंत्री गुलाब देवकर यांच्यासह अनेकांना अटक होणे, असा हा प्रवास आहे.