नगरसेवक, अधिकारी व ठेकेदारांच्या युतीमुळेच रस्ते बिकट
पावसामुळे खड्डेमय झालेल्या शहरातील रस्त्यांविषयी ओरड सुरू झाल्यावर महापालिका यंत्रणेने नेहमीप्रमाणे डागडुजीला सुरूवात केली असली तरी अवघ्या वर्षभरापूर्वी दुरूस्ती केलेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेला नगरसेवक, पालिका अधिकारी आणि ठेकेदारच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या घटकांमध्ये सोटेलोटे असल्यामुळे सर्रासपणे निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. पुन्हा पावसाळ्यात याच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे देखील संगनमताने केली जातात. शहरवासियांच्या करातून जमा झालेल्या रकमेची ही उधळपट्टी रोखण्यासाठी या तिन्ही घटकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.
पावसाने शहरातील बहुतेक रस्त्यांची चाळणी झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून
भ्रमंती करावी लागत आहे. काही ठिकाणी खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने तो खड्डा किती खोल, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघातही घडत असून खड्डय़ांमुळे धोकादायक झालेल्या रस्त्यांविषयी तक्रारींमध्ये वाढ होऊ लागल्यावर महापालिकेला डागडुजीचे काम हाती घेण्याची उपरती झाली आहे. खड्डय़ांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने महापौर अॅड. यतिन वाघ यांनी संपूर्ण शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सहाही विभागात खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरूवारी महापौरांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाने विश्रांती घेतल्याने खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे वाघ यांनी सूचित केले आहे.
गतवर्षी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खड्डय़ांच्या विषयावरून रान उठविले होते. रस्त्यांवरील खड्डय़ांच्या प्रश्नावरून मनसे कार्यकर्त्यांनी ठेकेदारांना धडा शिकविण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तो धागा पकडून मुंबईत मनसैनिकांनी ठेकेदारांना खड्डय़ांमध्ये उभे करून उठा-बशा काढण्याची शिक्षा दिल्याचे पहावयास मिळाले होते.
मुंबईत हे चित्र असले तरी नाशिकमधील मनसेचे पदाधिकारी शांत बसून होते. या वर्षी सत्ताधारी मनसेने तीच परंपरा कायम ठेवली आहे. वास्तविक, महापालिकेतील कोणते ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतात, याची माहिती लगेच उपलब्ध होऊ शकते. या स्वरूपाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना धडा शिकविण्याऐवजी मनसेने शांत बसून त्यांची पाठराखण चालविली आहे.
नवीन रस्त्यांची कामे करताना त्याच्या दर्जाबद्दल सर्तकता बाळगली तर भविष्यात ही परिस्थितीच उद्भवणार नाही. परंतु, ती परिस्थिती उद्भवणे सर्वाच्या हिताचे असल्याने उन्हाळा व हिवाळ्यात नवीन रस्ते आणि पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचे कामे यातच सर्वाना रस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टक्केवारीमुळे रस्त्यांची दुर्दशा
टक्केवारीच्या व्यवहारांमुळे रस्त्यांची दुर्दशा होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वर्षभरही रस्ते चांगल्या स्थितीत राहू शकत नाहीत. नागरिकांकडून कररूपाने संकलीत केलेला पैसा या कामासाठी वापरला जातो. पावसामुळे खड्डेमय झालेल्या रस्त्यांमुळे वाहनधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासणी करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. किमान आता तरी पालिकेने समिती नेमून या संपूर्ण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करायला हवी. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी नोंदवायला हव्यात. आपल्या घर परिसरातील रस्त्याचे काम करताना त्यात कोणती सामग्री वापरली गेली, गुणवत्तेचे निकष पाळले गेले की नाहीत, याची माहिती पालिकेकडून माहितीच्या अधिकारात प्राप्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. या माध्यमातून नागरिकही रस्त्यांच्या कामातील दोष पुढे आणू शकतात. रस्त्यांच्या दुरावस्थेविषयी तक्रार न करता शांतपणे हे सहन करणे योग्य नाही
मेजर पी. एम. भगत संघटन मंत्री, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नाशिक
खड्डय़ांचे सामा्रज्य नाशिक पालिकेच्या हद्दीत सर्वत्र पाहावयास मिळते. पंचवटीतील क्रांतीनगर ते मखमलाबाद रस्तो असो किंवा रामवाडी परिसर, खड्डय़ांनीच स्वागत होते. खड्डय़ांविषयी तक्रारी वाढल्यावर जाग आलेल्या यंत्रणेकडून दुरूस्तीची मलमपट्टी होऊ लागली आहे. मायको सर्कल हे त्याचे एक उदाहरण देता येईल. या सर्कलच्या बिकट अवस्थेवर ‘नाशिक वृत्तान्त’ने छायाचित्राव्दारे प्रकाशझोत टाकला होता.
जनहित याचिका दाखल करण्याची गरज
शहरवासीयांच्या करापोटी मिळणाऱ्या पैशांतून दरवर्षी नवीन रस्ते बांधणी व पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा वारेमाप खर्च केला जात आहे. महापालिका क्षेत्रात रस्त्यांच्या कामात होत असलेल्या अनिष्ठ प्रकारास पालिका अधिकारी, नगरसेवक व ठेकेदार यांचे साटेलोटे कारणीभूत आहे. खड्डेमय रस्त्यांसाठी हे तिन्ही घटक जबाबदार धरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शहरवासीयांनी जनहित याचिका दाखल करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ज्यावेळी उपरोक्त घटकांच्या वेतनातून दंडाची रक्कम काढून घेतली जाईल, तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने वचक बसेल. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून फारसे काही साध्य होत नाही. कारण, हे ठेकेदार मग पुढे दुसऱ्याच्या नावाने कामे घेऊन तो कित्ता गिरवतात. शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जनहित याचिकेद्वारे आधी नगरसेवक, अधिकारी व ठेकेदारांची साखळी मोडून काढण्याची आवश्यकता आहे.
अभय कुलकर्णी नाशिक फर्स्ट
महापौर व प्रशासनाच्या वेतनातून रक्कम कपात करावी
नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या हाती सत्ता द्या, नाशिकचे रस्ते गुजरातप्रमाणे खड्डे नसणारे करतो, असे अभिवचन दिले आणि शहरवासीयांनी मनसेच्या हाती सत्ता सोपवली. या पक्षाचा महापौर झाला. आज महापौर, स्थायी समिती अध्यक्ष ही सर्व प्रमुख पदे मनसेकडे असूनही शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. खड्डय़ांमुळे करदात्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मणक्यांचे आजार, खड्डय़ात पडून दुखापत, काहीवेळा मृत्यू अशी नागरिकांची अवस्था झाली आहे. मनसेच्यावतीने मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांच्या निषेधार्थ विशेष आंदोलन जाहीर केले आहे. मग, नाशिकमध्ये मनसेचा महापौर नागरिकांच्या पैशातून रस्ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदाराचे चांगभले का करतात ? गुजरातप्रमाणे चांगल्या दर्जाचे रस्ते का निर्माण होत नाहीत ? मनसे मुंबईतील रस्त्यांच्या खड्डय़ाप्रकरणी आंदोलन करीत आहे. मग, नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डय़ाप्रकरणी आंदोलन का नाही ? शहरातील सर्व रस्ते चांगले झाले पाहिजेत व खड्डे बुजविण्याचा खर्च करदात्यांच्या पैशातून न करता महापालिका प्रशासन आणि सत्तेतील पदाधिकारी यांच्या पगारातून वसूल करावे अन्यथा करदात्या नागरिकांच्यावतीने उपरोक्त मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली जाईल.- विलास देवळे नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत