हिंदी चित्रपटाचा रुपेरी पडदा म्हणजे गाणी, मस्ती, नृत्य, मेलोड्रामा आणि अतिरंजित अभिनय असे गणित झाले असले तरी अधूनमधून डोकेबाज दिग्दर्शक वेगळ्या पद्धतीचा सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येताना दिसतात. शूजित सरकार हाही वेगळा सिनेमा करणारा दिग्दर्शक अशी त्याची ख्याती आहे. अलीकडे सत्य घटनेची पाश्र्वभूमी असलेले थरारपट येत आहेत. ‘मद्रास कॅफे’ हा त्यापैकी एक राजकीय थरारपट आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येचा कट कसा शिजला असावा याचा अंदाज चित्रपटातून लावण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करतो. श्रीलंकेतील यादवी युद्ध आणि त्यानंतरच्या घटनांनंतर राजीव गांधी हत्येचा कट रचला गेला या सत्य घटनेच्या पाश्र्वभूमीवर सबंध चित्रपट नेमक्या पद्धतीने दिग्दर्शकाने उलगडला आहे. परंतु ढोबळ मानाने चित्रपट बनविणाऱ्या बॉलीवूडच्या ढंगाला छेदून पाश्चिमात्य पद्धतीचे चित्रण आणि पटकथेची गुंफण यामुळे बॉलीवूडचा प्रेक्षक गोंधळून जातो. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकाला घटनांची संगती लावण्यासाठी धडपड करायला लावणारा हा चित्रपट आहे. परंतु पटकथेची गुंफण आणि त्याला अनुसरून केलेले चित्रण, क्वचित प्रसंगी दिग्दर्शकाचे भाष्य यामुळे चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात थोडासा का होईना यशस्वी होतो. निव्वळ आणि ढोबळ मनोरंजन मात्र करत नाही.
विक्रम सिंग या गुप्तहेराला श्रीलंकेतील जाफना येथे सुरू असलेल्या यादवी युद्धामध्ये भारत सरकारकडून शांतता प्रक्रियेला सुरुवात करण्यासाठी भारत सरकारच्या गुप्तहेर संस्थेकडून पाठविले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेचे पालन करून शिताफीने युद्ध थांबवून शांतता प्रक्रिया सुरू करून यशस्वी करणे आणि शांतता प्रक्रियेची अंमलबजावणी केल्यानंतर श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुका घेता येतील अशी परिस्थिती निर्माण करणे या कामासाठी विक्रम सिंगला पाठविले जाते. तामिळ लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘एलटीएफ’ या लिट्टेसारख्याच एका संघटनेने पुकारलेले युद्ध, युद्धामागचे मूळ हेतू, त्याचा श्रीलंका तसेच भारतीय राजकारणावर पडलेला प्रभाव, युद्धापायी हजारो निरपराध लोकांचे बळी जाणे यामुळे चित्रपट अंगावर येतो.
‘एलटीएफ’चा प्रमुख अण्णा आणि त्याचा विरोधक श्री यांच्यातील युद्ध तसेच श्रीलंका सरकारविरोधात एलटीएफने पुकारलेले युद्ध या संघर्षांत लाखो लोकांचे जीव जातात. संघटना चालविण्यासाठी देशाबाहेरून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांकडून, गुप्तहेर संस्थांकडून प्रचंड प्रमाणात पैसा कसा मिळत असतो, लोकशाही स्थापन करण्यासाठी भारत सरकारकडून श्रीलंकेत शांतता निर्माण करण्यासाठी लष्कर पाठविले जाते. त्या लष्कराला नामुष्की ओढवून परत मायदेशी यावे लागते. अशा घटनांमागची प्रेरणा, राजकीय पक्ष तसेच धोरण म्हणून दोन देशांमधील परिस्थिती कशी निर्माण होते. शांतता प्रक्रिया अयशस्वी ठरविण्यासाठी कशा पद्धतीने भ्रष्टाचार आणि फितुरी करून लोक वागतात आणि त्याचा अंतिम परिणाम काय होतो अशा सगळ्या सत्य घटनांच्या पाश्र्वभूमीवर त्या घटनांचा अर्थ लावण्याचा, त्यामागचे सत्य, रहस्य उलगडण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला आहे.
जॉन अब्राहमने विक्रम सिंग झकास साकारला आहे. गुप्तहेर अधिकारी म्हणून त्याचा पडद्यावरचा वावर प्रेक्षकाला भारून टाकण्यात यशस्वी होतो.
यादवी युद्धात निरपराध्यांचे नाहक बळी कसे जातात, फितुरी आणि विश्वासघात, भ्रष्टाचारी वृत्ती यामुळे लोकांचे नाहक बळी घेणारी व्यवस्था आणि त्याचा वापर करणारे वेगवेगळे घटक कशा पद्धतीने देश रसातळाला नेऊ शकतात याचे दर्शन चित्रपट घडवितो. मेलोड्रामा, गाणी, नृत्यविरहित असूनही एका सत्य घटनेच्या रहस्याची उकल करण्यासाठी घटनांची संगती लावण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. त्याला छायालेखकाची आणि पटकथेची मिळालेली उत्तम साथ यामुळे चित्रपट परिणामकारक ठरतो.

मद्रास कॅफे
निर्माते – जॉन अब्राहम, रॉनी लाहिरी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक – शूजित सरकार
कथा-पटकथा – सोमनाथ डे, शुभेन्दू भट्टाचार्य
संवाद – जुही चतुर्वेदी
छायालेखक – कमलजित नेगी
संगीतकार – शंतनू मोईत्रा
कलावंत – जॉन अब्राहम, सिद्धार्थ बसू, नर्गिस फाकरी, राशी खन्ना, अजय रत्नम, पीयूष पांडे, दिबांग, प्रकाश बेलावडी, अ‍ॅग्नेलो डायस व अन्य.