प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात सहभागी झालेल्या उरणमधील कलाकारांचे मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी उरणमधील कलाकारांची निवड करण्यात आलेली होती. महाराष्ट्राच्या ‘पंढरपूरची वारी’ या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याने उरणमधील नागरिकांनी कलाकारांचे स्वागत केले. या रथात माऊलीची भूमिका करणाऱ्या जिया गोंधळी या चिमुकलीचेही चिरनेरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.
राज्यांची संस्कृती आणि विविधता दर्शविणाऱ्या चित्ररथातील कलाकार म्हणून उरणच्या रुद्राक्ष नृत्य कला अ‍ॅकॅडमीतील कलाकारांची निवड झाली होती. कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी साकारलेल्या पंढरपूरच्या वारीचा देखावा आणि त्याला लाभलेली प्रसिद्ध संगीतकार व गायक अजय-अतुल यांनी गायलेल्या ‘लय भारी’ चित्रपटातील ‘माऊली माऊली’ या गाण्यामुळे संपूर्ण राजपथ मंत्रमुग्ध झाला होता. याचा अभिमान अवघ्या महाराष्ट्राने बाळगला, तर या चित्ररथाचे भाग बनलेल्या उरणमधील कलाकारांचेही उरणकरांनी दिमाखात स्वागत करून महाराष्ट्राची शान वाढविल्याबद्दल गौरव केला.