शहरातील दत्त चौकात वेर्णेकर ज्वेलर्स या सराफी दुकानावर पडलेल्या दरोडय़ाप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला सोलापूर शहर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. उत्तम मुरलीधर भोसले (रा. तुंगत, ता. पंढरपूर, सध्या रा. हडपसर, पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याच्या टोळीकडून पोलिसांनी पाव किलो सोने यापूर्वीच हस्तगत केले आहे.
चार महिन्यांपूर्वी वेर्णेकर सराफाच्या दुकानात भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला होता. या गुन्हय़ाचा तपास लागत नव्हता. तथापि, सोलापूर ग्रामीण हद्दीत टेंभुर्णी येथे एका पेट्रोलपंपावर जमा रकमेची लूट करणाऱ्या एका टोळीला पकडले होते. याच टोळीने सोलापुरातील वेर्णेकर सराफाकडे दरोडा टाकला होता, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली. परंतु पोलिसांना या गुन्हय़ातील मुख्य सूत्रधार उत्तम भोसले हा सापडत नव्हता. अखेर शहर पोलिसांनी माहिती काढून उत्तम भोसले यास पुण्यात अटक केली. त्याच्याकडे आढळलेली मारुती झेन कार चोरीची असल्याचे आढळले. भोसले हा पोलीस नोंदीवरून सराईत गुन्हेगार असून त्याने सोलापूरसह पुणे, मुंबई, नांदेड, बीड आदी भागांत चोऱ्या व दरोडे घातल्याची माहिती उघड झाली आहे. शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, रवींद्र थोरात व गोविंद अधटराव यांच्या पथकाने ही कारवाई केली. उत्तम भोसले याची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे.