शिक्षण मंडळ कराड या नामवंत संस्थेचे आधारवड तसेच सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक चळवळीत मोलाचे योगदान देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. रामचंद्र गोविंद तथा रा. गो. प्रभुणे यांचे आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठेतील राहत्या घरी कर्करोगाने निधन झाले. ८१ वर्षीय डॉ. प्रभुणे गेल्या दोन, चार महिन्यांपासून अंथरुणाला खिळून होते. त्यांच्यामागे पत्नी वासंती प्रभुणे, जयश्री फडणवीस व भाग्यश्री कुलकर्णी या दोन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. रा. गो. प्रभुणे यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील- उंडाळकर, शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, सेवकवर्ग तसेच शहर परिसरातील मान्यवर व नागरिकांनी डॉ. प्रभुणे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दरम्यान, सायंकाळी उशिरा त्यांचे पार्थिव येथील लाहोटी कन्या प्रशालेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता अंत्ययात्रा निघणार असून, येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. रा. गो. प्रभुणे यांचा परिचय
शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन उत्तम कार्याबद्दल १९८९ मध्ये सर्वोच्च मानाच्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ. रा. गो. प्रभुणे यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. प्रभुणे यांच्या ‘साने गुरुजींच्या साहित्याची शैक्षणिक चिकित्सा’ या संशोधनपर प्रबंधास विद्यावाचस्पती पदवी (पीएच. डी.) प्राप्त झाली. या प्रबंधास शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार मिळून हा प्रबंध अभ्यासक्रमात समाविष्ट झाला. हा प्रबंध गं्रथरूपात १९९१ मध्ये प्रसिध्द झाला.
शिक्षण मंडळात उपशिक्षक, पर्यवेक्षक व ९ वष्रे मुख्याध्यापक, २५ वष्रे सहायक सचिव व १५ वष्रे सेक्रेटरी अशाप्रकारे दीर्घकाळ त्यांनी शिक्षण मंडळाची सेवा केली. ‘माझ्या वैखरीच्या वाणीचा प्रवास’ या त्यांच्या आत्मचरित्रास प्रतिष्ठेचा मुकादम साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. गुरुदेव कार्यकर्ता पुरस्कार, मधुसंचय पुरस्कार, ना. गोपाळकृष्ण गोखले महाराष्ट्र गौरव पुरस्कार, साने गुरुजी सेवा प्रतिष्ठा पुरस्कार, बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार, भारती विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार, शिक्षण भूषण पुरस्कार,यशवंतनिती, साहित्य आणि संस्कृती पुरस्कार, दलितमित्र कदम गुरुजी कृतज्ञता गौरव पुरस्कार यासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार डॉ. रा. गो. प्रभुणे यांना प्राप्त झाले होते. उद्या पत्रकार दिनानिमित्त येथील कृष्णाकाठ पत्रकार संघातर्फे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गुरुवर्य डॉ. रा. गो. प्रभुणे यांचा ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार होता. परंतु, आज डॉ. प्रभुणे यांची प्राणज्योत मावळल्याने पत्रकारांमध्येही कमालीची हळहळ व्यक्त होत आहे.
‘श्यामची आई संस्काराचा अमृतकुंभ’ हा ग्रंथ व ‘पेशवाईतील न्यायदेवता’ ही डॉ. प्रभुणे यांची कादंबरीही पुरस्कारप्राप्त ठरली. जडण-घडण, लोकमानसातील यशवंतराव व अध्यापनाच्या नव्या वाटा हे त्यांचे शैक्षणिक साहित्यही मोलाचे ठरले आहे. डॉ. प्रभुणे यांची आणखीही काही शैक्षणिक व इतर पुस्तके प्रसिध्द आहेत. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. शिक्षण मंडळाची धुरा दीर्घकाळ यशस्वी सांभाळणारे प्रभुणे कराडच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक होते. माहुलीच्या न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानचे ते कार्यवाह, कराडच्या पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अर्धनिवासी गुरुकुलचे संस्थापक होत.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. प्रभुणे हे उत्तम प्रवचनकार व नाटय़कलाकार होते. दिलखुलास, हसतमुख वक्ते अशीही त्यांची ओळख होती. नामी वक्ते असलेल्या डॉ. रा. गो. प्रभुणे यांनी साने गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त १९९९ साली ३०० व्याख्याने पूर्ण केली. गीता प्रवचनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त महामानव विनोबा यांच्याविषयी ७५ व्याख्याने दिली. त्यातील पहिले व्याख्यान धुळे कारागृहातील ३०० कैद्यांसमोर देऊन त्यांनी या व्याख्यानमालेस सुरुवात केली होती.