चवीला चांगले ते प्रकृतीला वाईट असा आपल्याला पाश्चिमात्यांनी दिलेला मंत्र चुकीचा असून जी गोष्ट चवीला चांगली ती प्रकृतीलादेखील चांगलीच असते. त्यामुळे आपल्या देशातल्या पारंपरिक अन्नपदार्थ सोडून जेव्हा आपण पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीचे अनुकरण करतो त्याचा त्रास आपल्या शरीराला नक्कीच सहन करावा लागतो. आपल्याकडच्या प्रत्येक समाजाची खाद्यसंस्कृती वेगळी आहे, पिढय़ान्पिढय़ा चालत आलेली ही संस्कृती आपण जपली, तर शरीर नेहमीच स्वस्थ राहील, असे मत आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मांडले. वेध परिषदेमध्ये मांडलेल्या ऋजुता यांच्या या विधानाचे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
माणसाने आपल्या जिभेचे आणि पोटाचे ऐकले पाहिजे. त्याला काय, किती हवे याचे पूर्ण जाणीव असते. आपण कामात तसेच मोबाइल, लॅपटॉप, गॅझेट्समध्ये इतके अडकलेलो असतो, की पोटाचे काही आपणास ऐकूच येत नाही. वजन वाढल्यावर मात्र त्याची जाणीव होते. मग डाएट सुरू होतो. अनेकदा आहारतज्ज्ञ आपली प्रकृती, काम, घरचे वातावरण या गोष्टी लक्षात घेत नाहीत आणि हे खा, ते खाऊ नका, असे फुटकळ सल्ले देतात. आपण या सल्ल्यांसाठी हजारो रुपये मोजतो. त्यापेक्षा आपण आपल्या घरातील आजीला जर विचारले, तर ती आपण नेमके काय खायला हवे ते अगदी योग्य सांगू शकते. त्यामुळे आपल्या घराची खाद्यसंस्कृती आपणच तयार केली पाहिजे आणि आजच्या घरातील ज्येष्ठांनी तो खाद्यसंस्कृतीचा ठेवा पुढच्या पिढीला दिला पाहिजे, असा सल्ला दिवेकर यांनी दिला. भात, नारळ, तूप, खोबरं यांचा समावेश तर आपल्या अन्नात असलाच पाहिजे. कारण ते आपले पारंपरिक अन्न आहे. आंबा, चिकू, केळी, सीताफळ ही फळंदेखील आपल्यास उपयुक्त अशीच आहेत. जे आपल्या मातीतून येते तसेच जे इथल्या वातावरणात वाढते ते आपल्या शरीरासाठी नक्कीच उपयुक्त आहे. मी जेव्हा या गोष्टी सांगितल्या त्यापेक्षा करीना कपूरने या गोष्टींना प्रसिद्धी दिल्यानंतर लोकांचा त्याकडे बघण्याचा कल बदलला, असे दिवेकर म्हणाल्या. पैसे भरा आणि वजन कमी करा अशा जाहिरातींपासून सावध राहा, असा सल्लाही त्यांनी दिला.