कृषी विद्यापीठाचा आणि माती व पाण्याचा तसा घनिष्ठ संबंध आहे. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी शेतीत उत्पादनवाढीसाठी केला पाहिजे. संशोधनाची नवनवी क्षितिजे गाठताना कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून माती-पाण्यासंदर्भात मूलभूत कृती कार्यक्रम आखला गेला पाहिजे.
शेतीसंदर्भात मूलगामी घटक असलेल्या माती व पाणी या दोन्ही घटकांचे तसे मोल करता येत नाही. त्यांची जपणूक, जतन झाले पाहिजे. मराठवाडा कृषी विद्यापीठ त्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न करीत असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हे प्रयत्न साकारले जात असल्याचे सध्या दिसून येत आहे.
कृषी विद्यापीठातून वाहून जाणारी माती थोपवली पाहिजे. तसेच सिंचनाचे स्रोत नव्याने निर्माण झाले पाहिजेत, या उद्देशाने विद्यापीठात दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अधिक बियाणे उत्पादनासाठी सिंचन स्रोत विकास हा प्रकल्प या आर्थिक वर्षांपासून पुढील तीन वर्षांसाठी राबविण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून या प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्र, तसेच बीजोत्पादन प्रक्षेत्रावर राबविण्यात येत आहे.
मराठवाडा कृषी विद्यापीठातूनच िपगळगड नाला वाहतो. या नाल्यावर कोणतीच उपाययोजना न केल्याने दरवर्षी पावसाळय़ात या नाल्याचे पात्र विस्तारते. विद्यापीठाच्या जमिनीवर नाल्यास पूर आल्यानंतर अनेकदा पिकांनाही फटका बसला. मुख्य म्हणजे काळी माती वाहून गेली आहे. अशा स्थितीत या नाल्याची बांधबंदिस्ती करणे आवश्यक होते. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या या नाल्याचा विकास प्रकल्प सुरू असून या संदर्भातली कामे प्रगतिपथावर आहेत. सुरुवातीला या नाल्याचे पात्र अतिशय कमी होते. पण दिवसेंदिवस त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हे पात्र विस्तारले गेले. जमिनीची मोठी झीज झाली. नाल्याच्या आजूबाजूला बाभळीची झुडपे वाढली होती. काठावरच्या जमिनीही वहितीसाठी योग्य राहिल्या नव्हत्या. नाला पात्रात मोठय़ा प्रमाणात गाळ साठल्याने पाण्याच्या प्रवाहाची क्षमता अत्यंत कमी झाली होती. परिणामी दरवर्षीच िपगळगड नाल्याला पूर आल्यानंतर नवनव्या समस्या निर्माण होत होत्या. सुपीक जमिनीची तर हानी होत होतीच, पण बियाणे उत्पादनाचे नुकसान होत होते. विद्यापीठ परिसरातील ५९२ हेक्टर जमीन यामुळे नापीकसदृश झाली होती. कृषी विद्यापीठ परिसरातील १ हजार ९०० टन सुपीक मातीचा थर दरवर्षी वाहून जात होता आणि २ हजार ४९७ क्विंटल अन्नधान्याचे नुकसान होत होते. हे नुकसान लाखो रुपये किमतीचे होते. मराठवाडा कृषी विद्यापीठात तयार होणाऱ्या बियाण्याला शेतकऱ्यांमध्ये मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांत सिंचन सुविधेअभावी बियाण्यांचे उत्पादन घटू लागले. या सर्व बाबींचा कुलगुरू डॉ. गोरे यांनी बारकाईने विचार केला आणि त्यांच्या संकल्पनेतून िपगळगड नाला विकसित करण्याचा प्रकल्प राबविण्यात आला.
विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पाणीसाठवण तलावाची निर्मिती करून सिंचन स्रोत विकसित करणे, जमिनीचे व्यवस्थापन नि या सर्व बाबींचा उपयोग अधिक बियाणे उत्पादनासाठी करणे हा उद्देश समोर ठेवून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सिंचन स्रोत विकास प्रकल्प सादर केला होता. कुलगुरू डॉ. गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला सरकारकडून मंजुरी मिळाली. आता या प्रकल्पाची राज्य सरकारच्या जलसंपदा विभागामार्फत अंमलबजावणी सुरू आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात तीन कोटी लीटर क्षमतेचे पाणीसाठवण तलाव करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाचे उद्घाटन राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते झाले. तब्बल शंभर मीटर लांबी, शंभर मीटर रुंदी नि तीन मीटर खोली असे हे शेततळे आहे. साधारण एवढे मोठे शेततळे कुठेही पाहायला मिळत नाही. या शेततळय़ामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रावरील बियाणे उत्पादनासाठी ५० ते ६० हेक्टर क्षेत्रावर सिंचन लाभ होणार आहे. या प्रकल्पाद्वारे आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करुन बियाणे उत्पादन वाढविण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. या तंत्रज्ञानाला दूरगामी दृष्टिकोनाची जोड असली पाहिजे, या दृष्टीने कृषी विद्यापीठ पावले उचलत आहे.
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात िपगळगड नाला पात्राचे विद्यापीठ परिसरातील क्षेत्रात रुंदीकरण, खोलीकरण, जमीन सपाटीकरण अशी कामे हाती घेतली आहेत. कामाची सुरुवात विद्यापीठ परिसरातील शेंद्रा येथून असून पिंगळी शिवारापर्यंत पाण्याचे नियोजन आहे. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून मोठमोठय़ा यंत्रांद्वारे ही कामे झपाटय़ाने पूर्ण केली जात आहेत. कृषी विद्यापीठाच्या शेंद्र परिसरातील ५५० हेक्टर जमीन गेल्या बऱ्याच वर्षांपासून पडीक होती. ती आता या विकासकामांमुळे वहितीखाली येणार आहे. िपगळगड नाल्याचे पात्र कमी असल्याने थोडय़ा पावसानेही या नाल्यास पूर येत असे. आता रुंदीकरणामुळे पुराच्या समस्येवर तोडगा निघणार आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली बाभळीची झाडे काढून ही जमीन वहितीखाली आणण्यात येणार आहे. त्याचा फायदाही बियाणे उत्पादनास निश्चित होणार आहे. मुख्य म्हणजे या प्रकल्पामुळे पिंगळी शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे पुरामुळे होणारे नुकसान वाचणार आहे. विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत असून प्राचार्य डॉ. अशोक कडाळे, प्रा. मदन पेंडके, प्रा. भास्कर भुईभार आदींच्या मार्गदर्शनाद्वारे तो पूर्ण होत आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ व जलसंपदा विभागातील अधिकारी, प्राध्यापक प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2012 रोजी प्रकाशित
माती-पाण्याचे संवर्धन करणारा ‘मकृवि’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
कृषी विद्यापीठाचा आणि माती व पाण्याचा तसा घनिष्ठ संबंध आहे. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी शेतीत उत्पादनवाढीसाठी केला पाहिजे. संशोधनाची नवनवी क्षितिजे गाठताना कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून माती-पाण्यासंदर्भात मूलभूत कृती कार्यक्रम आखला गेला पाहिजे.

First published on: 12-12-2012 at 01:07 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makruvi project on land and water culture