पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी दिली.पुणे विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन शाखेच्या परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. प्रत्येक पेपरच्या आदल्या दिवशी रात्री अकरानंतर एसएमएसने प्रश्नपत्रिका मिळत असल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. या सर्व प्रकारातील सत्यता पडताळण्यासाठी विद्यापीठाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने विद्यापीठाकडे आपला अहवाल सादर केला आहे. प्रश्नपत्रिकेबाबत मिळत असलेले एसएमएस हे विद्यार्थ्यांचे नुसतेच तर्क होते. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका फुटली नव्हती, असा अहवाल या समितीने दिला आहे. या समितीने ६७ जणांकडे या प्रकरणाबाबत चौकशी केली असून त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, परीक्षा नियंत्रक, पेपर सेटर यांचा समावेश आहे.याबाबत कुलगुरू म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना आलेल्या एसएमएसमध्ये फक्त टॉपिक सांगितले जात होते. मात्र, त्यावर प्रत्यक्ष प्रश्न काय येणार याबाबत काही माहिती नव्हती. येणारे एसएमएस हे विद्यार्थ्यांनी नुसतेच लढवलेले तर्क होते. त्यामध्ये काही तथ्य नव्हते. सलग चार-पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून असे तर्क करता येऊ शकतात. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटलेल्या नाहीत. या विषयांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार नाही.’’