मराठी संत साहित्य आणि अभंगांची आजच्या तरुण पिढीला ओळख करून देण्यासाठी ‘फेसबुक’ या सर्वात मोठय़ा सोशल नेटवर्किंग साइटवर ‘मनातील अभंग’
(www.facebook.com/abhangwani) हे विशेष पान तयार करण्यात आले आहे. सध्या २७ हजार जणांनी हे पान ‘लाइक’ केले आहे. या पानावर संत तुकाराम, संत नामदेव आणि संत चोखामेळा यांचे एक हजारांहून अधिक अभंग देण्यात आले आहेत.  ‘मनातील अभंग’ हे पान तयार करणारे कौस्तुभ शुक्ल यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा यांच्या विरोधात तसेच जाती, पंथ यातील भेद दूर करण्यासाठी सर्व संतांनी अभंगांच्या माध्यमातून समाजात मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली. संतांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात आणि तेच आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवावेत, यासाठी मे-२०११ मध्ये हे पान तयार करण्यात आले. फेसबुकवरील या पानाला सर्व स्तरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून यात तरुणांचा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त आहे.
या पानावर ‘ज्ञानेश्वरी’तील सर्व अध्याय देण्यात आले असून लवकरच ज्ञानेश्वरीतील एक ओवी आणि त्याचा अर्थ याची माहिती देण्याचा विचार असल्याचे सांगून शुक्ल यांनी सांगितले की, या पानावर दररोज एक नवीन अभंग देण्याचा आमचा प्रयत्न असतो. अभंग दिला की त्याला वाचकांचा प्रतिसाद खूप मोठय़ा प्रमाणात मिळतो. किमान २०० ते २५० जणांचे ‘लाइक’ या पोस्टला येत असल्याची माहितीही शुक्ल यांनी दिली.
आजच्या पिढीला किंवा त्या अगोदरच्या पिढीलाही पं. भीमसेन जोशी किंवा लता मंगेशकर यांनी गायलेले संतांचे काही ठराविक अभंगच माहिती आहेत. पण माहिती नसलेलेही अनेक अभंग असून ते अर्थासह या पानावर आम्ही देत असतो. या निमित्ताने माझाही अभ्यास आणि वाचन होते, असेही शुक्ल यांनी सांगितले.