भारतीय सिनेमाच्या शतसांवत्सरिक वर्षांत ‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमा माध्यमातील विविध घटकांवर बनविलेल्या चार वेगवेगळ्या लघुपटांनी एकत्रित बनलेला चार दिग्दर्शकांचा चित्रपट विशेष सन्मान म्हणून प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार आहे. या चारपैकी एक लघुपट ‘गँग्स ऑफ वासेपुर’फेम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी बनविला आहे. परंतु, यंदाच्या कान्सचे महत्त्व कश्यप यांच्या दृष्टिने एवढय़ापुरतेच सीमित नाही. त्यांची सहनिर्मिती असलेला ‘मान्सून शूटआऊट’ हा भारतीय दिग्दर्शकाचा आणि संपूर्णपणे मुंबई व पुण्यात चित्रीत झालेला चित्रपटही यंदाच्या ‘कान्स’ महोत्सवातील ‘मिडनाईट मुव्ही’ विभागात दाखविण्यात येणार आहे. अमित कुमार यांनी या ‘मान्सून शूटआऊट’चे दिग्दर्शन केले आहे.  
पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमधून प्रशिक्षण घेतलेले अमित कुमार यांचा हा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट आहे. संशयित गँगस्टर आणि एक नवखा पोलीस या मुख्य व्यक्तिरेखांभोवती सिनेमाची गुंफण अमित कुमार यांनी केली आहे. गँगस्टर आणि पोलीस समोरासमोर येतात आणि पोलीस गँगस्टरला गोळी झाडणार हा क्षण येतो. गोळी झाडायची की नाही असा प्रश्न पोलिसाच्या मनात उत्पन्न होतो. त्याला निर्णय घ्यायचा असतो. त्याच्या या निर्णयाचे या घटनेशी संबंधित अन्य व्यक्तींच्या जीवनावर काय परिणाम होणार आहेत, असा विषय अमित कुमार यांनी या चित्रपटात हाताळला आहे.   पोलिसाच्या मनात उभे राहणारे नैतिकतेचे द्वंद्व यावर चित्रपटात भर देण्यात आला असून या चित्रपटाचे सहनिर्माता अनुराग कश्यप असले तरी इंग्लंडचे मुख्य निर्माता आहेत. त्या अर्थाने पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमधून प्रशिक्षण घेतलेल्या एका नवख्या भारतीय दिग्दर्शकाचा हा आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे. कान्स महोत्सवातील ‘मिडनाईट मुव्ही’ विभागात केवळ दोनच चित्रपटांची निवड करण्यात आली असून दुसऱ्या चित्रपटाचे नाव ‘ब्लाईण्ड डिटेक्टिव्ह’ असे आहे.