बुद्धी व श्रमाच्या साह्य़ाने माणूस स्वत:ला विकसित करतो. त्यामुळेच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. भांडवलशाहीत मानवी बुद्धी व श्रमाची अप्रतिष्ठा, अवमूल्यन करण्यात येते. मार्क्सवादी तत्त्वज्ञान याविरुद्ध ठाम भूमिका घेते. मानवी शोषण निवारण्याचा हा शास्त्रीय मार्ग ठरतो, असे प्रतिपादन विचारवंत अजित अभ्यंकर यांनी केले.
भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) वतीने आयोजित ‘मार्क्सवादी तत्त्वज्ञान व सिद्धांत’ या विषयावर अभ्यंकर बोलत होते. ते म्हणाले, की मार्क्सवादी तत्त्वज्ञान द्वंद्वात्मक भौतिकवाद व ऐतिहासिक भौतिकवादावर उभे आहे. जग प्रवाही व सतत बदलत असते. यातील प्रत्येक घटक परस्पर अनुबंधित, परस्पर संबंधित आहेत. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाने माणसाला केंद्रबिंदू मानून त्याला माणूस म्हणून विकसित कसे करता येईल, याचे प्रारूप दिले. भारतीय परंपरेत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशी त्यांचे नाते आहे. इतर प्राणी निसर्ग आहे तसा स्वीकारतात, वर्तन व्यवहार करतात. मनुष्य मात्र श्रमातून निसर्गावर प्रक्रिया करून त्याला अनुकूल बनवतो. हे श्रम केवळ शारीरिक नसतात, तर बुद्धीचाही यात सहभाग असतो. त्यातून तो निर्मितीचा सामूहिक ‘स्व’प्रत्ययाचा आनंद मिळवतो. या साठी सामूहिक जीवन संघर्षही घडतो. भांडवलशाहीत सामूहिक श्रमप्रक्रिया, निर्मिताचा आनंद हिरावून घेतला जातो. मनुष्यत्व हिरावून घेऊन त्याला पशुत्व दिले जाते. मार्क्सवादी व्यक्तीची प्रतिष्ठा टिकवून श्रमाला मनुष्यत्व प्रदान करणारे तत्त्वज्ञान आहे. मानवी विकासातील नकारात्मक भाग टाळून पुढे जाणे, सकारात्मक बदल घडवून आणणे, श्रम, स्त्री-पुरुष, जातीजन्य, शहर-ग्रामीण विषमता नष्ट करणे मार्क्सवादाचे अंतिम ध्येय आहे. प्रास्ताविक माकपचे जिल्हा सचिव प्रा. पंडित मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन भगवान भोजने यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2013 रोजी प्रकाशित
‘मार्क्सवादी तत्त्वज्ञान म्हणजे मानवी शोषण निवारण्याचाच शास्त्रीय मार्ग’
बुद्धी व श्रमाच्या साह्य़ाने माणूस स्वत:ला विकसित करतो. त्यामुळेच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. भांडवलशाहीत मानवी बुद्धी व श्रमाची अप्रतिष्ठा, अवमूल्यन करण्यात येते. मार्क्सवादी तत्त्वज्ञान याविरुद्ध ठाम भूमिका घेते. मानवी शोषण निवारण्याचा हा शास्त्रीय मार्ग ठरतो.
First published on: 20-08-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marxist ideology a way to counter human exploitation