मेडिकल रुग्णालयात एचआयव्हीग्रस्तांना औषधे मिळत नसल्याने  उपचारापासून वंचित राहावे लागत असून कंपनीकडून औषधांचा पुरवठा होत नसल्याची माहिती समोर आली आहे.
मेडिकलमध्ये एडसच्या रुग्णांच्या उपचारासाठी ‘एआरटी’ सेंटर आहे. मात्र अनेक दिवसांपासून तेथे औषधांचा पुरवठा नसल्याचे वृत्त समजते. एड्स बाधितांचे आयुष्य वाढविण्यासाठी ‘अॅण्टी रेट्रोव्हायरल थेरपी’ महत्त्वाची मानली जाते. रुग्णांची प्रतिकारशक्ती  वाढवावी यासाठी या सेंटरमधून दरमहिन्याला औषधे पुरविली जातात. मेडिकलमध्ये विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी येतात. १८ ते २० हजार रुग्णांची आतापर्यंत नोंद करण्यात आली असून १० हजार रुग्णांना औषधे पुरविली जातात. दरमहा औषधांचा नियमित पुरवठा घेऊन जाणाऱ्या रुग्णांची संख्या ५ ते ६ हजारांच्या आसपास आहे. एडसच्या रुग्णांची नोंदणी झाल्यावर रुग्णाला झिडोनोडिन, लेमिनोडिन व नॅव्हीरॅप या तीन औषधांचे एकत्रिकरण दिले जाते. दुसऱ्या भागात औषधांमध्ये टिनोफोव्हीर, लेमिनोडिन आणि नेव्हीरॅफ दिले जाते. मेडिकलमधून टिनोफोव्हीरच्या ३५ हजार तर नेव्हीरॅपच्या ३८ ते ४० हजार युनिटचा पुरवठा केला जातो. परंतु नेव्हीरॅपचा साठा नसल्यामुळे रुग्णांना १५ दिवसांच्या गोळ्या दिल्या जातात. या औषधांबाबत नॅकोकडे सातत्याने विचारणा करूनही लवकर औषधे नागपुरात येण्याची शक्यता आहे. औषधांचा किती साठा आला त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा नावाडे यांनी सांगितले.म