मुंबईत सर्वसामान्यांना स्वस्तात घरे देण्यासाठी स्थापन झालेल्या ‘म्हाडा’चे रूपांतर बेदरकार अशा सरकारी बिल्डरमध्ये झाल्याची प्रचीती पुन्हा एकदा आली आहे. रहिवाशांना ताबा मिळाल्यानंतर वर्षभरात शीव प्रतीक्षा नगर येथील मध्यम उत्पन्न गटातील इमारतीच्या खांबांना तडे गेले असून त्यामुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता ‘म्हाडा’चे अधिकारी दुरुस्तीचा खटाटोप करत असले तरी यामुळे रहिवाशांच्या मनातील इमारतीच्या बांधकामाच्या विश्वासालाच तडे गेले आहेत. ‘म्हाडा’च्या बांधकामाचा दुय्यम दर्जा आणि त्यातील भ्रष्टाचारच या निमित्ताने समोर आला आहे.

‘म्हाडा’च्या २०११ मधील सोडतीत शीव प्रतीक्षा नगर येथील मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश होता. त्यातील बिल्डिंग क्रमांक आठमध्ये चार विंग असून प्रत्येकी सात मजले आहेत. एका मजल्यावर चार घरे अशारितीने ११२ रहिवासी या इमारतीत राहतात. २०११ मधील सोडतीनंतर दोन वर्षांनी भोगवटा प्रमाणपत्र मिळून २०१३ मध्ये या इमारतीमधील घरांचा ताबा रहिवाशांना मिळाला. मुंबईत हक्काचे घर मिळाले या आनंदात लोक या इमारतीमधील ४३७ चौरस फुटांच्या घरात राहायला आले. मात्र वर्ष उलटत नाही तोच इमारत ज्या आधारावर उभी आहे त्या खांबांनाच तडे गेल्याचे दिसून आले. जवळपास २० खांबांना अशारितीने तडे गेल्याने रहिवाशांनी तक्रार केली असता आता ‘म्हाडा’ने खांबांच्या दुरुस्तीचा खटाटोप सुरू केला आहे. ही दुरुस्ती आहे की दुय्यम दर्जाच्या बांधकामावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न अशी कुजबूजही सुरू झाली आहे. त्याचबरोबर या इमारतीच्या कुंपण भिंतीचे कामही अधर्वट आहे. मागच्या बाजूला भिंतच उभारलेली नाही. त्यामुळे अतिक्रमणाचा धोका आहे.
इमारतीच्या तळमजल्यावर खांबांनाच तडे गेल्याचे दिसल्याने रहिवासी घाबरले आहेत. घरात येऊन वर्ष झाले नाही तोच ही अवस्था असेल तर पुढच्या दहा वर्षांनंतर इमारतीची अवस्था काय होईल अशी भीती मनात बसली आहे. इमारतीच्या बांधकामाचा दर्जा इतका सुमार असेल तर एखादा छोटा भूकंप आला तरी इमारत पडण्याचा धोका नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया या इमारतीमधील रहिवासी सोहेल शेख यांनी व्यक्त केली.