राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला मिहान प्रकल्प उद्योगांऐवजी ज्ञान पर्यटन केंद्र बनला आहे. या प्रकल्पात गेल्या चार महिन्यांत एकाही नवीन कंपनीची गुंतवणूक नाही.या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. कोटय़वधी रुपयांच्या पायाभूत निर्माण करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. विविध देशातील गुंतवणूकदार आणि वाणिज्यदूत मिहानला भेटही देत आहेत, पण गुंतवणूक करण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येते. अलीकडे अनेक देशातील वाणिज्यदूत आणि व्यापारी प्रतिनिधी मंडळींच्या या प्रकल्पातील भेटी वाढल्या आहेत. भावी गुंतवणूकदार म्हणून ‘एमएडीसी’कडून त्यांच्या सरबराईवर हजारो रुपये खर्ची घातले जातात. मात्र. मिहानचा फेरफटका मारून गुंतवणुकीबाबत ठोस पावले टाकली जात नसल्याने मिहान हे विविध देशांच्या वाणिज्यदूत आणि व्यापारी प्रतिनिधींसाठी ज्ञान पर्यटन केंद्र ठरू पाहत आहे. नागपुरातील आमदार मुख्यमंत्री झाल्याने मिहानविषयी आशादायी चित्र रंगवण्यात येत आहे. ‘अभी नही तो कभी नही’ असे अधिकाऱ्यांनाही वाटत आहे. सरकार, प्रशासन आणि स्थानिक नागरिक सगळेच सकारात्मक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गावातील प्रकल्प म्हणून अनेक देशातील वाणिज्यदूत आणि उद्योजकांचे प्रतिनिधी मिहानला भेटदेखील देऊ लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी १० ऑक्टोबर २०१४ ला शपथ घेतल्यानंतर फ्रान्स, अमेरिका आणि जपानच्या महावाणिज्यदूत आणि व्यापारी प्रतिमंडळाने या प्रकल्पाला भेट दिली. येत्या शनिवारी चीनचे वाणिज्यदूत आणि प्रतिमंडळ येत आहेत. याआधी ऑक्टोबर २०१४ मध्ये चीनचे प्रतिनिधीमंडळ येथे आले होते. विदर्भातील एकमेव विशेष आर्थिक असलेल्या मिहानला जगातील या प्रमुख देशांच्या भेटी झाल्या आहेत. परंतु यापैकी एकाही देशाने अद्यापतरी गुंतणुकीबाबत एमएडीसीसोबत करार केलेला नाही. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी खासदार नसताना संपूर्ण विदर्भाचा दौरा करून मिहान प्रकल्पाविषयी जोरदार मार्केटिंग केले. ‘पॉवर पाईन्ट प्रेझेंटेशन’द्वारे हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असे स्वप्न दाखण्यात आले. ते केंद्रात मंत्री होऊन दहा महिने झाले आणि राज्यात सरकार स्थापनेला चार महिने होत आले आहेत. पण विदेशातील एकाही मोठय़ा कंपनीला मिहानमध्ये गुंतवणूक करावी, असे वाटलेले नाही. भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्यभागी असलेल्या मिहान प्रकल्पाला ‘अच्छे दिन’ आणण्याचा विविध पातळीवर प्रत्यत्न सुरू आहे. मिहानच्या कृतीदलाचे नेतृत्व गडकरींकडे देण्यात आले आहे. गेल्या चार महिन्यांत अमेरिका, फ्रान्स, आणि जपान या देशांच्या वाणिज्यदूत आणि व्यापारी प्रतिनिधींनी मिहानला भेट दिली. याआधी देखील फ्रान्सच्या महावाणिज्यदूतावासाने भेट दिली होती. तसेच ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांचे महावाणिज्यदूत येथे येऊन गेले. परंतु गुंतणुकीबाबतचे कोणतेही ठोस आश्वासन अद्यापतरी कुणाकडूनही मिळालेले नाही. यामुळे मुंबईत असलेले विविध देशांचे महावाणिज्यदूत औपचारिकतेचा भाग म्हणून मिहानच्या पायाभूत सुविधा पाहण्यासाठी येतात आणि निघून जातात. त्यांच्यासाठी मिहान प्रकल्प ज्ञान पर्यटन केंद्र झाले आहे.* फ्रान्स, अमेरिका, जपानच्या महावाणिज्यदूताची मिहानला भेट.* एमएडीसीकडून सरबराईवर लाखो रुपये खर्च.* गेल्या चार महिन्यात एकाही नवीन कंपनीची गुंतवणूक नाही.* मिहानच्या भेटीनंतर गुंतणूकदार पायाभूत सुविधांची प्रशंसा, पण गुंतवणुकीबाबत गप्प.राजेश्वर ठाकरे, नागपूर