वाहनचालकांना परवाना देण्याचा अधिकार असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाणे दुस्वप्न झाले आहे. महाविद्यालयीन तरुण, तरुणी, वृद्ध स्त्री-पुरुष  टोकन हाती घेऊन लांबच लांब रांगांमध्ये दिवसभर उन्हा-तान्हात ताटकळत उभे असल्याचे चित्र कुणालाही नवे नाही. लायसन्ससाठी खिडकी सकाळी ९.३० वाजता उघडते. परंतु, लोक आठ वाजेपासूनच रांगा लावून असतात. दिवसभराच्या प्रतीक्षेनंतरही नंबर लागेल, याची शाश्वती नाही. सायंकाळी ५.३० वाजता खिडकी बंद होते. अनेक गृहिणी घरची कामे सोडून, नोकरी करणारे अनेकजण सुटी टाकून, महाविद्यालयीन विद्यार्थी टय़ूशन क्लासेस, महाविद्यालयांचे तास बुडवून लायसन्ससाठी रांगेत लागलेले असतात. एवढय़ा खस्ता खाल्ल्यानंतरही लायसन्स मिळाले नाही तर दलालाला शरण जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु, दलालाची फी प्रत्येकालाच परवडणारी नसते.
ड्रायव्हिंग स्कूलच्या उमेदवारांना सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी सवलत आहे. त्यांना घरपोच लायसन्स दिले जाते. आरटीओतील सद्यस्थिती ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकांच्या दादागिरीची आहे. त्यामुळे चारचाकी किंवा दुचाकीचे लायसन्स काढण्यासाठी वैयक्तिक पातळीवर आलेल्यांकडे कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. ड्रायव्हिंग स्कूल संचालक आरटीओत ‘राज’ करीत आहेत. एका महिलेने याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिच्याकडे आरटीओ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तिने आठवडय़ातील एक दिवस प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूलसाठी राखीव ठेवावा आणि त्याच दिवशी त्या ड्रायव्हिंग स्कूलच्या लायसन्सची औपचारिकता पूर्ण करावी, अशी सूचना तिने केली होती.
गिरीपेठेतील आरटीओ कार्यालयात वेस्ट आणि ईस्ट अशा दोन विंग्ज आहेत. सामान्य माणसाला येथे किंमत नाही, अशीच स्थिती आहे. कारण, आरटीओ निरीक्षकांच्या एकूण दहा पदांपैकी पाच पदे रिक्त आहेत. लायसन्स प्राप्त करण्यासाठी होणारी गर्दी आणि निरीक्षकांची संख्या याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. या विंग्जमध्ये येणाऱ्यांसोबत भेदभाव केला जात असल्याच्याही तक्रारी मोठय़ा प्रमाणात आहेत. सुटीच्या आदल्या दिवशी आणि सुटीच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी उसळत असते. आरटीओ निरीक्षक सचिन गाडगे यांच्या मते ड्रायव्हिंग स्कूलच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप गैरसमजातून करण्यात आला असून तो चुकीचा आहे. कार्यालयात सामान्य लोकांनाही चांगली वागणूक दिली जाते. आरटीओच्या दाव्याची अनेकांनी खिल्ली उडविली आणि दलालाच्या मार्फत आल्यानंतरच काम लवकर होते, याचा दाखले दिले.