नरेंद्र मोदी सरकारातील अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विदर्भातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा अर्थसंकल्प उद्योजकधार्जिणा असल्याचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी म्हटले असून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी मात्र हा अर्थसंकल्प गरिबांची निराशा करणारा असल्याचे म्हटले आहे.
उद्योजकांचा अर्थसंकल्प -डॉ. श्रीनिवास खांदेवाले
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पहिल्याच भाषणात हे सरकार सामान्य माणसांप्रती समर्पित राहील, असे प्रतिपादन केले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. अर्थसंकल्प तयार करताना त्यांनी उद्योजक महासंघाशी चर्चा केली, पण शेतकरी, ग्राहक, श्रमिकांशी त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा नाही, तर उद्योजकांचा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अर्थव्यवस्थेची नाळ तुटली असून ती परत जोडण्यासाठी विकास वाढविण्यासंदर्भात मोदींनी वक्तव्य केले होते. तसे काहीही दिसून आले नाही. परकीय गुंतवणूक, खासगीकरण यातून ते साध्य करू, असेही ते म्हणाले. पण जोपर्यंत नफा दिसून येत नाही तोपर्यंत परकीय गुंतवणूक होणे शक्य नाही. महानगरांभोवती १०० स्मार्ट शहरे उभारण्याची घोषणा  करण्यात आल्यामुळे अकारण नागरीकरण वाढणार आहे. त्याऐवजी स्मार्ट गावे उभारण्याचे मनावर का घेतले नाही? मध्यमवर्गाला करसवलत मिळाली असली तरीही बेरोजगाराला रोजगार आणि शेती विकासावर ठोस निर्णय घेतलेले नाही. या अर्थसंकल्पामुळे कारखानी क्षेत्राला आधार मिळाला आहे.
ईशान्येतील राज्यांकरिता चांगली तरतूद करण्यात आली आहे. लहान व मध्यम उद्योगांद्वारा उद्योग निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येत असल्याचे प्रतिपादन, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.

विकासाबद्दल व्हीजन मांडणारा अर्थसंकल्प -फडणवीस
देशाच्या विकासाबद्दल व्हीजन मांडणारा आणि प्रत्यक्षात साकरण्यात येणारा अर्थसंकल्प अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले. अर्थसंकल्पात महागाई, शेतीचा विकास, रोजगार निर्मिती मानवसंसाधन विकास, पायाभूत सुविधा या महत्त्वाच्या प्रश्नावर प्रभावी उत्तरे शोधली आहे. सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून देशाच्या विकासाला नवीन देणारा आहे. शेती आणि शेतीपूरक कामामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेद्वारा काम करण्याची घोषणा क्रांतीकारक आहे त्यामुळे या योजनेला चांगली चालना मिळेल. कोरवाहू शेतीसाठी प्रधआनमंत्री सिंचन योजना, शेतीसाठी सौरपंप योजना, शेतमालाच्या भावामध्ये स्थैर्य आणण्याची योजना अशा विविध योजनांमुळे देशाला स्थॅर्य मिळेल. महिलांच्या संरक्षण व सक्षमीकरणासाठी चांगल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विदर्भात ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स)च्या धर्तीवर प्रगत वैद्यकीय केंद्र उभाण्याच्या निर्णय तसेच महाराष्ट्रात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट ची शाखा स्थापन करण्याचे निर्णयाचे फडणवीस यांनी स्वागत केले.

उद्योगांना संजीवनी -किरण पातूरकर
उद्योगांसह सर्वच क्षेत्रात उर्जितावस्था आणणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर आणण्याचे काम येणाऱ्या काळात होऊ शकेल, अशी आशा आहे. मध्यम उद्योगांना चालना देणाऱ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. लघू उद्योगांच्या विकासासाठी सरकार समिती स्थापन करणार आहे. रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे, ही जमेची बाजू आहे. उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. सात इंडस्ट्रियल स्मार्ट शहरे विकसित करण्याची योजना असो किंवा उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती असोत, उद्योगक्षेत्रात आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. पर्यटनातून रोजगार निर्मितीकडे अधिक लक्ष देण्याचे सरकारचे धोरण स्पष्ट झाले आहे. आजवर हे क्षेत्र दुर्लक्षित होते, असे मत फेडरेशन ऑफ इंडस्ट्रिज असोसिएशन, विदर्भचे अध्यक्ष किरण पातूरकर यांनी व्यक्त
केले आहे.

गरिबांची निराशा -शांताराम पोटदुखे
चंद्रपूर- हा अर्थसंकल्प निराश करणारा आहे. यात सामान्यांसाठी काहीही नाही. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुसते हवेत वार केले आहेत. प्रत्येक योजनेसाठी शंभर कोटी राखून ठेवण्याचा त्यांचा निर्णय अतिशय हास्यास्पद आहे. काही राज्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन या अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली, हे स्पष्टपणे दिसून येते. देशाची अर्थव्यवस्था डळमळीत असताना यावेळी चांगला अर्थसंकल्प बघायला मिळेल, ही आशा जेटलींनी फोल ठरवली आहे. केवळ उद्योगांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प गरीबांना मात्र निराश करणारा आहे.

आशादायक अर्थसंकल्प -उपगन्लावार
मोदी सरकारच्या कारकीर्दीतील पहिला अर्थसंकल्प आशादायक ठरला. विशेष म्हणजे, देशभरात उभारण्यात येणाऱ्या चार नव्या एम्स रुग्णालयांपैकी एक विदर्भात उभारले जाणार आहे.
सोबतच चार नवी आयआयटी आणि आयआयएमची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही आयआयएम सुरू करण्याची घोषणा स्वागतार्ह आहे. सिंचन सुविधांचा विकास साधण्याकरिता ‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई’ योजनेकरिता एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ आणि इतर ठिकाणाचा ७० टक्क्यांपर्यंतचा सिंचनाचा अनुशेष भरून निघेल. पाच पर्यटन सर्किट तयार करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा कॉर्पस फंड हे स्वागतार्ह पाऊल आहे. यामुळे विदर्भ, तसेच मध्यप्रदेशातील व्याघ प्रकल्पांचा विकास होईल, असे मत विदर्भ आर्थिक विकास परिषदेचे (वेद) राहुल उपगन्लावार यांनी व्यक्त केले.

श्रीमंतधार्जिणा अर्थसंकल्प -मुळे
कंपन्याच्या नफेखोरीला वाव देण्यासाठी करांमध्ये सवलती, कल्याणकारी योजनांमध्ये तरतूद, परकीय गुंतवणुकीसाठी परवाना, देशातील गरिबीचा विचार न करता उच्च प्रतीची शहरे, असे श्रीमंतधार्जिणा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पूर्वीच्या सरकारचे धोरण आणखी तीव्रतेने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. अलंकारिक पद्धतीने अनेक घोषणा करण्यात आल्या असल्या तरी त्यावरील तरतूद कमी करण्यात आली. या अर्थसंकल्पामुळे तळ्यावर आलेली अर्थव्यवस्था पूर्णत्वाला जाऊ शकणार नाही. पीपीपीद्वारे सर्व योजना पूर्ण करण्याच्या प्रयत्नामुळे अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेला धक्का पोहोचेल, अशी प्रतिक्रिया भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मनोहर मुळे यांनी दिली.

सर्वसमावेशक -खा. आनंदराव अडसूळ
अमरावती- पायाभूत व्यवस्था उभारण्यावर भर देणारा आणि शेती-उद्योगांना बळ देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सरकारने सादर केला असून सर्वच स्तरातील लोकांना त्याचा फायदा मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली आहे. सिंचन व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. विदर्भात नवीन ‘एम्स’ रुग्णालय उभारले जाणार आहे, ही आनंदाची बाब आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून राज्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. कृषीक्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी ५ हजार कोटी रुपयांची
तरतूद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल, असे अडसूळ म्हणाले.

मध्यमवर्गीयांना दिलासा -पांडे
केंद्रीय अर्थसंकल्पाने मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ अध्यक्ष गजानन पांडे यांनी व्यक्त केले. विदर्भात एम्सची स्थापन होणार असल्याने विदर्भाच्यादृष्टीने गौरवाची बाब आहे. कर वाढलेले नसल्याने महागाई वाढण्याची शक्यता कमी आहे, असे पांडे म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी अनेक योजना -अरविंद नळकांडे
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी थेट परकीय गुंतवणुकीला प्राधान्य देण्याविषयी सुतोवाच करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या भविष्यातील आशा आकांक्षाना मूर्त स्वरूप देणारा हा अर्थसंकल्प ठरू शकतो. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ही चांगली बाब आहे. शेती फायद्यात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, शेतकऱ्यांना आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज दराने कर्ज घेण्याची घोषणा झाली आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकेल, असे शेतकरी नेते अरविंद नळकांडे यांनी सांगितले.

वाखाणण्याजोगा -रमेश मामीडवार
सामान्यांच्या गरजा भागवणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंवर उत्पादन शुल्कात कपात करून जेटली यांनी मोठा दिलासा दिला आहे. त्याच वेळी तंबाखूजन्य पदार्थावर कर वाढवून योग्य निर्णय घेतला आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, स्त्रियांची सुरक्षा, या प्रश्नांवर या अर्थसंकल्पात भरीव तरतूद
करण्यात आली आहे. सध्या अतिशय वाखाणण्याजोगा अर्थसंकल्प असेच वर्णन करावे लागेल. सामान्य करदात्यांना आयकरात अधिक सवलत देण्याचा निर्णयही योग्य आहे. सामान्य जनतेने बचतीकडे वळावे, यासाठी भविष्यनिर्वाह निधीची मर्यादा वाढवण्याचा योग्य निर्णय जेटली यांनी घेतला आहे. सध्याच्या खडतर आर्थिक परिस्थितीत हा अर्थसंकल्प योग्य आहे, असेच म्हणावे लागेल. समाजातील सर्व घटकांचा समतोल विचार या अर्थसंकल्पात  करण्यात आला आहे.