यवतमाळ जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून यापुढे विधानसभेची निवडणूक लढणार नाही आणि मुलालाही लढवणार नाही, असे येथे आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत कासावार यांनी सांगितले.
पाच वेळा निवडणूक लढवून चार वेळा आमदार राहिलेल्या वामनराव कासावार यांच्यासह जिल्ह्य़ातील सर्व नेत्यांनी, आमदार आणि मंत्र्यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये, घराणेशाहीसुद्धा लादू नये, अशी मागणी जिल्ह्य़ातील दुसऱ्या फळीतील काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. वामनराव कासावार यांनी चार दिवसांपूर्वीच स्वत:चे अध्यक्षपद कायम ठेवून कार्यकारिणी बरखास्त केली होती. कार्यकारिणीत अविचारी, कृतिशून्य आणि कुणाबद्दल आदर नसलेले, पक्षावर निष्ठा व प्रेम नसलेले, भाषेची मर्यादा न पाळणारे कार्यकर्ते भरती झाले होते. म्हणून आपणही कार्यकारिणी बरखास्त केली होती, असे कासावार यांनी स्पष्ट केले. मात्र, काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील सर्व कार्यकर्त्यांनी बुधवारी बैठक घेऊन कासावार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. आपल्या मागणीचे निवेदनही त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याकडे पाठवले होते. आपल्या राजीनाम्यावर येणारी निवडणूक न लढण्याच्या भूमिकेबद्दल काँग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील व आपल्याला मान्य राहील, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. काँग्रेसचा मार्ग सुकर व्हावा, आपली अडचण दूर व्हावी, नव्या रक्ताला वाव द्यावा म्हणून आपण राजीनामा दिल्याचे सांगून कासावार म्हणाले की, कुठल्याही दबावाला बळी पडून राजीनामा दिलेला नाही.
काँग्रेस सोडून आपण इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. उभ्या आयुष्यात आपल्यावर पक्षांतराचा डाग नाही, हेही त्यांनी आवर्जून सांगितले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे हेसुद्धा निवडणूक लढवणार नाहीत का आणि आपल्या पुत्रांनाही लढवणार नाहीत का असा प्रश्न विचारला असता कासावार म्हणाले की तो त्यांचा प्रश्न आहे. निर्णय त्यांना घ्यायचा आहे. मी माझा निर्णय जाहीर केला आहे.