लोकसभा निवडणुकीचा प्रचार हळूहळू तापू लागला असून उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या घडामोडींना वेग आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सहाही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरोधात महायुती अशीच मुख्य लढत असली तरी नाशिकमध्ये मनसे आणि रावेर मतदारसंघात अपक्ष उमेदवारामुळे अधिकच रंगत आली आहे. उमेदवार महायुती किंवा आघाडीचे असले तरी त्यांना स्वपक्षावरच अधिक अवलंबून राहावे लागत आहे. मित्रपक्षांकडून फारसा उत्साही सहभाग घेण्यात येत नसल्याने ‘आपले ओझे आपणच ओढावे’ या तत्त्वानुसार उमेदवारही मित्रपक्षांवर फारसे अवलंबून न राहता हितचिंतक, नातेवाईक आणि मित्र परिवारावरच प्रचारासाठी अधिक अवलंबून आहेत.
नाशिक मतदारसंघात आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ असले तरी त्यांच्या प्रचारात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अजूनही फारसा सहभाग दिसत नाही. भुजबळ हे शहरातील विविध मंडळ, संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींना भेट देत असताना काँग्रेसची मंडळी एक-दोघांचा अपवाद वगळता प्रचारापासून अलिप्त आहेत. एवढेच नव्हे तर, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी काढण्यात आलेल्या फेरीत काँग्रेसचे झेंडे गायब होते. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचीही अशीच गत असून गोडसे यांच्या प्रचारात भाजपची मंडळी फारशी दिसत नाही. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एक-दोन मेळावे घेतले असले तरी नेहमीचा जोश अजूनही त्यांच्यात दिसत नाही. मुळात शिवसेनेचे अनेक स्थानिक नेते, नगरसेवकही शांत आहेत. रिपाइं तर प्रचारापासून खूपच दूर आहे. प्रचारापासून दूर असलेल्या आघाडी आणि महायुतीच्या अशा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उमेदवाराकडून ‘उत्तेजन’ मिळण्याची अपेक्षा आहे. उमेदवार ‘उत्तेजन’ देत नसल्याने ही मंडळी शांत असल्याचे म्हटले जाते. निवडणुकीत मित्र पक्षांकडून असे काही होऊ शकते याची जाणीव आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना असल्याने या मंडळींवर विसंबून न राहता त्यांनी प्रचारासाठी स्वत:चे वेगळेच जाळे निर्माण केल्याचे दिसत आहे. हे जाळे गोडसे यांच्यासाठी ग्रामीण भागात तर, भुजबळ यांच्यासाठी शहरी भागात अधिक काम करीत असल्याचे दिसते. मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारात उघडपणे असा रुसवा दिसत नसला तरी कुरबुरी सुरूच आहेत. दिंडोरी मतदारसंघातही नाशिकचीच पुनरावृत्ती होताना दिसते. भाजपचे उमेदवार खा. हरिश्चंद्र चव्हाण यांना शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सातत्याने मनधरणी करावी लागत आहे. तर, राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांना काँग्रेस नेत्यांची. या मतदारसंघात प्रत्येक पक्षात अनेक गट-तट असून त्या सर्वाचे समाधान करण्याचा प्रयत्न उमेदवारांना करावा लागत आहे.
धुळे मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार आ. अमरीश पटेल यांच्या प्रचारापासून राष्ट्रवादी काहीशी दूर आहे. मालेगाव आणि बागलाण या दोन तालुक्यांमध्ये हे चित्र अधिक प्रकर्षांने जाणवत आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णयच धुळ्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. अथक प्रयत्नानंतर वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर शिवसेना आता कुठे डॉ. भामरे यांच्या प्रचारात दिसू लागली आहे. नंदुरबार मतदारसंघात राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले डॉ. विजयकुमार गावित यांनी मुलगी हीना हिच्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर, काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित हेही विजयकुमार यांच्याकडील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांना उमेदवारांकडून ‘उत्तेजन’ मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादीचे मनीष जैन यांच्यातील लढाईत काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवण्याचा हट्ट धरल्याने तिरंगी लढाई होत आहे. जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेचे संबंध फारसे चांगले नसल्याने आपल्या सुनेसाठी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना शिवसेना नेते व कार्यकर्त्यांची विनवणी करणे भाग पडत आहे. तर, राष्ट्रवादीचे मनीष जैन आणि खा. ईश्वरलाल जैन यांना काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. जळगाव मतदारसंघात भाजपचे खा. ए. टी. पाटील आणि राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांच्यातील लढतीतही कार्यकर्ते अजून ‘उत्तेजन’ मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2014 रोजी प्रकाशित
मित्रपक्षांत जवळीक थोडी, दुरावा अधिक
लोकसभा निवडणुकीचा प्रचार हळूहळू तापू लागला असून उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या घडामोडींना वेग आला आहे.
First published on: 10-04-2014 at 12:52 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns and independent candidates create more interest in raver constituency