डॉकयार्ड रोड दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका सभागृहात महापौरांनी आयोजित केलेल्या विशेष सभेत प्रशासनावर टीकेचे आसूड ओढून आपला घसा मोकळा करणारे बहुतेक नगरसेवक आणि विरोधी पक्षाचे गटनेते पालिका आयुक्तांच्या उत्तराच्यावेळी मात्र गायब झाले. त्यामुळे सर्वच पक्षांना या विषयाचे किती गांभीर्य आहे ते जगासमोर आले.
नेहमी नाक वर करून माझा पक्ष वेगळा असल्याच्या बाता मारणाऱ्या राज ठाकरे यांच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या २९ नगरसेवकांपैकी अवघे सात नगरसेवक उपस्थित होते तर याच पक्षाचे गटनेते दिलीप लांडे हेही आयुक्तांच्या उत्तराच्यावेळी उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते धनंजय पिसाळ हेही गायब झाले होते. मुंबई शहरात गेल्या काही वर्षांमध्ये इमारत दुर्घटनेच्या अनेक घटना घडल्या त्या प्रत्येकवेळी सभागृहात नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले मात्र यानंतर आयुक्तांच्या उत्तर ऐकण्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असायची. डॉकयार्ड येथील दुर्घटना ही अत्यंत गंभीर असल्यामुळे शनिवारी या विषयावर विशेष सभेचे दुपारी एक वाजता आयोजन करण्यात आले. प्रत्यक्षात ही सभा तीन वाजता सुरू होऊन रात्री अकरापर्यंत सुरु होती.
पालिकेच्या २२७ नगरसेवकांपैकी सुमारे ८५ नगरसेवकांची भाषणे झाली. यानंतर आयुक्तांनी या दुर्घटनेचा घटनाक्रम तसेच नेमके काय झाले व पालिकेने काय केले हे सांगून कारवाईची माहिती दिली. यावेळी सभागृहात सर्वपक्षांचे मिळून अवघे ८५ नगरसेवक उपस्थित होते. यात विरोधी पक्षातील काँग्रेसचे १२ तर राष्ट्रवादीचा अवघा एक नगरसेवक उपस्थित होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २९ नगरसेवकांपैकी अवघे सात नगरसेवक उपस्थित होते तर गटनेता दिलीप लांडे हे आपले भाषण साडेपाच वाजता आटपून निघून गेले. आपले नेतेच गेल्याचे पाहून अन्य नगरसेवकांनीही काढता पाय घेतला.
आयुक्तांच्या उत्तरानंतर सत्ताधारी शिवसेना-भाजपने कोणताही प्रतिक्रिया दिली नाही तर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी आक्षेप घेत सभात्याग केला. या सभात्यागात केवळ मनसेचे सात व काँग्रेसचा एक नगरसेवक सहभागी झाला होता. एवढी गंभीर घटना घडल्यानंतर आयुक्तांच्या उत्तरासाठी राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, बाजार समितीचे अध्यक्ष साबारेड्डी बोरा तसेच अन्य काही समितीच्यांचे अध्यक्ष अनुपस्थित राहणार असतील तर नगरसेवक किती गंभीर आहेत हे स्पष्ट होते, असे पालिके च्याच एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मुंबई महापालिकेतील मनसेच्या नगरसेवकांच्या ‘कामगिरी’ चा ‘अर्थपूर्ण’ आढावा घेण्याची जबाबदारी असलेले आमदार नितीन सरदेसाई यांनीही या गंभीर गोष्टीची साधी दखलही घेतली नसल्याचे मनसेच्याचनगरसेवकांचे म्हणणे आहे.