अंबरनाथमधील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी जलवाहिनी हटविण्याच्या मुद्दय़ावरून झालेल्या वादातून मनसे कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार बुधवारी संध्याकाळी घडला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते. पूर्व विभागातील वडवली वेल्फेअर सेंटर ते लोकनगरी दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारी जलवाहिनी त्वरित हटविण्यासाठी पालिकेने जीवन प्राधिकरणास पत्रही लिहिले होते. मात्र तरीही या विभागाकडून कारवाई करण्याबाबत टाळाटाळ होत असल्याबद्दल जाब विचारण्यासाठी नियोजन सभापती आणि मनसेचे गटनेते संदीप लकडे कार्यकर्त्यांसह जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात गेले. तेव्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. येत्या आठ दिवसांत जलवाहिन्या हटविण्याचे काम न केल्यास जीवन प्राधिकरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.