बेकायदा बांधकामाविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे धास्तावलेल्या एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या जोडगोळीने ठाणे बंदची हाक देताच त्यांच्यामागे फरफटत जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या दट्टय़ानंतर बंदमधून काढता पाय घेतल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. असे असले तरी शिंदे-आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्यासाठी मनसेच्या नेत्यांना कुणी भरीस पाडले, याची खमंग चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सर्वपक्षीय बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांचे मत होते. मात्र मनसेच्या मुंबईतील एका ज्येष्ठ आमदाराने ठाण्यातील पदाधिकाऱ्यांकडे आग्रह धरल्याचे सांगितले जाते.
वागळे, किसननगर येथे बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई सुरू होताच अस्वस्थ झालेले शिवसेनेचे संपर्क नेते एकनाथ शिंदेयांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी दिलजमाई केली आणि ठाणे बंदची हाक दिली. बंदची घोषणा करताना आव्हाड यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आपल्या सोबत घेतले खरे, मात्र शिवसेनेला आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपची मनधरणी करण्यात अपयश आले. तरीही मनसेच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन ठाण्याचा बंद सर्वपक्षीय असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. या मुद्दय़ावर शिवसेना-राष्ट्रवादीसोबत जाऊ नये, असे मनसेच्या एका मोठय़ा गटाचे म्हणणे होते. ठाणे महापालिकेत मनसेचे नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असले तरी महापालिकेबाहेर पक्षाची स्वतंत्र भूमिका असावी, असा मानणारा एक मोठा गट स्थानिक पातळीवर आहे. त्यामुळे शिंदे-आव्हाडांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहू नये आणि धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसंबंधी स्वतंत्र भूमिका जाहीर करावी, असा मनसेच्या काही स्थानिक नेत्यांना आग्रह होता. मात्र मुंबईतील पक्षाच्या एका ज्येष्ठ आमदाराने स्थानिक नेत्यांना या वादग्रस्त पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्यासाठी भरीस पाडल्याची चर्चा रंगली आहे. मुंबईतील या आमदाराचे आणि एकनाथ शिंदे यांचा जुना दोस्ताना आहे. ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यानही हा दोस्ताना चर्चिला गेला होता. राजदरबारी वजन असलेल्या या आमदाराचा आग्रह स्थानिक नेत्यांना अव्हेरता आला नाही. बुधवारी राज ठाकरे यांनी यासंबंधी भूमिका घेताच मनसेच्या स्थानिक नेत्यांना जोरदार चपराक बसल्याचे चित्र पुढे आले असले तरी मुंबईतून त्यासाठी आग्रह धरणारा हा आमदार कोण, याचीही चर्चा आता रंगली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2013 रोजी प्रकाशित
मनसेची फरफट नेमकी कोणामुळे ?
बेकायदा बांधकामाविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे धास्तावलेल्या एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या जोडगोळीने ठाणे बंदची हाक देताच त्यांच्यामागे फरफटत जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या दट्टय़ानंतर बंदमधून काढता पाय घेतल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले.
First published on: 19-04-2013 at 12:33 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns trail exactily by whom