राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी येथील विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले. विभाग नियंत्रकांना निवेदनही देण्यात आले.
शाखा अभियंता आर. के. काझी यांना २०१२ ते २०१६ कामगार करारांतर्गत आर्थिक फायद्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यात यावा. असाच अन्याय लिपिक एन. व्ही. जाधव यांच्यावरही झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. मनमाड, नांदगाव, येवला, सटाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर या आगारातील चालक, वाहक, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामगिरीवर अतिरिक्त बोजा टाकण्यात येत आहे. यासंदर्भात उदाहरणांसह लेखी स्वरूपात कामगारांवर झालेल्या अन्यायाविषयी कळविण्यात येऊनही त्यांना न्याय मिळालेला नाही. इगतपुरी आगारातील काही कामगारांना मारहाण, धमकी, अरेरावी यांसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागले असले तरी त्यांच्यावरील अन्यायाची दखल घेण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. सिन्नर आगारातील व्यवस्थापकांनी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याचे लेखी दिले असले तरी त्याप्रमाणे कोणतीही कार्यवाही झाले नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. मध्यवर्ती कार्यालयात महिला कामगारांवरील अन्यायाविषयी सात डिसेंबर २०१३ रोजी बैठक होऊन महिला कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि अजूनही महिला कर्मचाऱ्यांना सन्मान मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. पुरुष वाहकांना देण्यात येणारा खाकी गणवेश हा अत्यंत निकृष्ठ दर्जाचा असून मुंबई कार्यालयाने मंजूर केल्याप्रमाणे चांगल्या प्रतीचा खाकी गणवेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यांसह इतर अनेक प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने विभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा मार्ग अनुसरला गेल्याचे संघटनेचे पदाधिकारी सुभाष जाधव, सुरेश गायकवाड यांनी म्हटले आहे.