‘खड्डेच खड्डे चोहीकडे, रस्ते गेले कोणीकडे’ अशी ‘टॅग’ लाईन वापरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शहरात स्टेशन रस्त्यावरील खड्डय़ांवर ‘लांब उडी’ मारण्याची स्पर्धा घेऊन लक्ष वेधले. मात्र, या स्पर्धेत तसे सहभागी होण्याची गरज नसतेच. कारण रोजच उडय़ा माराव्याच लागतात! परंतु आंदोलन म्हणून आयोजित केलेल्या या ‘स्पर्धे’ त काहींनी अशा उडय़ा मारणेही पसंत केले.
एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापालिकेसमोर आयुक्तांसाठी दुचाकी सजवून तयार ठेवली होती. आयुक्तांनी या दुचाकीवरून शहरातून एकदा तरी फेरफटका मारावा, असे अभिप्रेत होते. आयुक्तांना ते शक्य नसल्यास किमान तीन अभियंत्यांनी खड्डेयुक्त रस्त्यांची पाहणी करावीच, असे साकडे घालण्यात आले होते. पण अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वनी बंद ठेवले होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी आचारसंहिता असल्याने ‘काही’ च करता येणार नाही, असे सांगून सुटका करून घेतली. रस्त्याच्या कारणावरून अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना झापण्याचाही प्रकार घडला.
रस्त्यांवरील खड्डय़ांसाठी ही दोन आंदोलने झाली. मात्र, उत्तर काय आले, हे समजू शकले नाही. शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रेल्वे स्टेशनकडील रस्ता तयार करण्याचे काम रेंगाळत सुरू आहे. ते बंदच असते. महापालिकेच्या मनात आले आणि शिवसेनेच्या एखाद्या नेत्याने सभागृहात गदारोळ केला की, पुन्हा काम सुरू होते. या रस्त्यांवरील खड्डय़ांची खोली दिवसेंदिवस वाढतच आहे. रस्त्यांच्या या अवस्थेला कंटाळलेल्या सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेऊन मनसेने खड्डय़ांवरून लांब उडी मारण्याची स्पर्धा आयोजित केली होती. औरंगाबाद शहरात बी २, डेफर्ट पेमेंट व रुंदीकरणांतर्गत रस्त्यांच्या कामावर ४५ कोटी खर्च केले आहेत. ही रक्कम नेमकी कोणाच्या घशात गेली, असा सवाल मनसेच्या वतीने मंगळवारी उपस्थित करण्यात आला.
रस्त्यांची ही अवस्था असताना शहर अभियंता पदासाठी अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावरून उडय़ा मारत आहेत. पॅचवर्कच्या कामासाठीही मोठा निधी खर्च झाला. या कामांसाठी नेमलेल्या चौकशी समितीने काहीच काम केले नाही, असा आरोप मनसेचे सुमित खांबेकर यांनी केला. रस्त्यात एवढे खड्डे आहेत की, अनेकांना मान आणि कंबरदुखीचे विकार जडले आहेत. त्यामुळेच मनसेने आयोजित केलेल्या लांब उडी स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला.
अंजली टॉकीजसमोरील रस्त्यावर खड्डय़ांची अवस्था राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्तांसमोर मांडली. शहरात बहुतांश रस्त्यांवर खड्डे असून त्याची किमान आयुक्तांमार्फत पाहणी व्हावी, अशी मागणी होती. उपायुक्त पेडगावकर यांनी तीन अभियंते पाहणी करतील, असे मान्य केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी सजवून महापालिकेसमोर उभी केली होती. परंतु आचारसंहितेचे कारण देत या आंदोलनाची दखल घेण्याचे महापालिका प्रशासनाने टाळल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस मिलिंद पाटील यांनी केला.