नांदेड शहर व जिल्हय़ाच्या काही भागांत दिवसेंदिवस टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आजमितीस १११ टँकरच्या माध्यमातून जनतेची तहान भागवली जात असली, तरी टंचाईची तीव्रता लक्षात घेता टँकरची संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे.
मराठवाडय़ातल्या अन्य जिल्हय़ांच्या तुलनेत नांदेड जिल्हय़ात पिण्याच्या पाण्याची फारशी टंचाई नाही. गेल्या तीन वर्षांत पावसाच्या लहरीपणामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पर्यायाने जिल्हय़ातील छोटेमोठे प्रकल्प पूर्ण भरलेच नाहीत. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातील जलसाठा नांदेडकरांची तहान सध्या भागवत आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पुरेल एवढे पाणी या प्रकल्पात आहे. शहराच्या काही भागात विशेषत: नवीन वसाहतीत मात्र हातपंप आटल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.
शहरालगतच्या सरपंचनगर, वाडी, लोकमित्रनगर, वामननगर, अष्टविनायकनगर, तथागतनगर, तुळशीरामनगर, स्वयंवर मंगल कार्यालय, सखोजीनगर, शिवदत्तनगर, मित्रनगर, शिवरायनगर, दत्तनगर, अंबानगर, बेलानगर, भगवाननगर यासह अनेक भागांतील नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावरच भागवली जात आहे. कमी पावसामुळे भूजलपातळी कमालीची घटल्याने ६०० ते ७०० फू ट बोअर मारूनही पाणी लागत नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्या भागात महापालिकेचा पाणीपुरवठा आहे तेथेही कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विशेषत: लोहा, कंधार, नायगाव, माहूर, हदगाव, उमरी, भोकर व नांदेड तालुक्यांत १११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. लोहय़ात सर्वाधिक ४४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. १६ गावांत खासगी व शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यापाठोपाठ कंधार तालुक्यात २७, तर नायगाव व भोकर तालुक्यांत १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
सोळापैकी अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, बिलोली, धर्माबाद, देगलूर व किनवट तालुक्यांत अजून टँकरची गरज पडली नाही. पण काही गावांत टंचाईच्या झळा जाणवू लागल्याने लवकरच काही टँकर सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक विहीर खोल करणे व त्यातील गाळ काढण्याची विशेष मोहीम हाती घेतली. यानुसार जिल्हय़ात २३ विहिरींतील गाळउपसा करण्यात येणार आहे. २७१ गावांतील विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. ९२७ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित होते. पैकी ४४८ प्रस्ताव प्राप्त झाले. विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीसाठी १ हजार ५२२ प्रस्ताव प्राप्त झाले. पैकी ८२५ विहिरींची दुरुस्ती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.