कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. रविवारी विश्रामगृहात काँग्रेस पक्षाच्यावतीने गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मुलाखतींचा कार्यक्रम पार पडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक नगरसेवकांची संख्या वाढतच आहे. याबाबत कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. स्थायी समिती सदस्य संख्येच्या तुलनेत इच्छुकांची यादी मोठी असल्याने दोन्ही काँग्रेस नेत्यांना त्यातून मार्ग काढतांना कसरत करावी लागत आहे.
कोल्हापुरातील महापालिकेतील स्थायी समिती सदस्य निवडीच्या हालचालींना गती आली आहे. स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांचा समावेश आहे. याजागी नवे सदस्य नियुक्त केले जाणार असून अनेक नगरसेवकांनी नेत्यांना गळ घालण्यास सुरूवात केली आहे.    इच्छुकांची यादी वाढत चालल्याने कामगारमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, संभाजीराजे छत्रपती, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव, प्रा.जयंत पाटील, मानसिंग गायकवाड यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. त्यामध्ये इच्छुक नगरसेवकांची मते आजमाविण्यात आली. राजू लाटकर, सर्जेराव पाटील, आदिल फरास, सुनिल पाटील, प्रकाश गवंडी, रेखा आवळे यांनी समितीत जाण्याची इच्छा दर्शविली. विशेष म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षाचे कांही नगरसेवक या समितीत जाण्यासाठी इच्छुक आहेत.     रविवारी विश्रामगृहात गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, महापौर जयश्री सोनवणे, शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, पक्षनेते श्रीकांत बनछोडे यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मनोगत जाणून घेतले. स्थायी समितीत काँग्रेस पक्षाला एक जागा मिळणार असली तरी ती मिळण्यासाठी दिलीप भुर्के, रणजित परमार, सचिन चव्हाण, राजू घोरपडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. परिवहन समितीत काँग्रेस तीन जागा मिळणार असून चौघेजण इच्छुक आहेत. महिला सक्षमीकरणाची चर्चा सर्व पातळीवर जोरात असली तरी महिला व बालकल्याण समितीत जाण्यासाठी फारसे कोणी इच्छुक नसल्याचे चित्र दिसत आहे.