नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने मुंबईकरांना सामाजिक ‘नाईटलाईफ’ अनुभवण्याची एकमेव संधी उरलेली असताना त्यालाही वेळेची मर्यादा घालून मुंबईकरांचा तो आनंद हिरावून घेतला जात असल्याचे ताशेरे ओढत ३१ डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, बार दीड वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा मुंबई पोलिसांचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी बासनात गुंडाळला. एवढेच नव्हे, तर दीडची मर्यादा पहाटे पाचपर्यंत वाढविण्याचे तसेच हॉटेल्स, क्लब, पबमध्ये पहाटे पाचपर्यंत संगीत वाजविण्यासही न्यायालयाने परवानगी दिली.
नववर्षांच्या स्वागताचा जल्लोष मनमुरादपणे साजरा करता यावा याकरिता राज्य सरकारने हॉटेल्स, बार, क्लब, पब पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. परंतु त्यानंतर लगेचच घातपाती कारवायांची धमक्या आणि महिलांच्या सुरक्षेचा हवाला देत मुंबई पोलीस आयुक्तांनी नवा फतवा काढून रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स, बार खुले ठेवण्यावर दीड वाजेपर्यंतची मर्यादा घातली. मुंबई पोलीस गरीब-श्रीमंत असा भेदभाव करीत असल्याचा आरोप करीत ‘आहार’ने पोलीस आयुक्तांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आदेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पोलिसांकडून आदेशाच्या समर्थनासाठी केलेला युक्तिवादही न्यायालयाने ‘अतार्किक’ म्हणून फेटाळून लावला. नववर्षांचा जल्लोष लोकांना मनसोक्तपणे साजरा करता येईल याकरिता गृहमंत्रालयाने हॉटेल्स, बार, क्लब, पब पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. असे असतानाही याच गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस विभागाने या आदेशाच्या विरोधात जाऊन नवा आदेश कसा काय काढला, दोन दिवसांत असे काय घडले की नवा आदेश काढावा लागला, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.
त्यावर यासिन भटकळचा सुरतवर अणुबॉम्ब हल्ला घडविण्याबाबतचा जबाब आणि खांडवा कारागृहातून सात दहशतवादी पळाल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबईत ३१ डिसेंबरच्या रात्री घातपाती कारवाया घडविण्यात येऊ शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्याचा दावा सरकारी वकील धैर्यशील नलावडे यांनी केला. त्यावर मुंबई नेहमीच याबाबतीत असुरक्षित राहिलेली असल्याचा टोला न्यायालयाने हाणून त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. त्यानंतर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु त्यावरही ‘शक्तीमिल’प्रकरण ३१ डिसेंबरच्या रात्री घडले नव्हते, असे सुनावत हे कारण पोलिसांनी सांगू नये, असे न्यायालयाने ठणकावले. अखेर मनुष्यबळाच्या अभावाचे कारण पोलिसांकडून सांगण्यात आले. ते काही अंशी मान्य वा फेटाळून लावत पोलिसांकडे नव्या आदेशाचे समर्थन करण्यासाठी ठोस कारण नसल्याचे स्पष्ट केले आणि पहाटे पाचपर्यंत हॉटेल्स, बार खुली ठेवण्यास परवानगी दिली. पंचतारांकित हॉटेल्स आणि क्लब यांना यातून वगळण्यात आले असले तरी तेथेही दीडपर्यंतच मद्यपानास परवानगी देण्यात आल्याचा अजब दावा पोलिसांकडून करण्यात आला.
दुसरीकडे हॉटेल्स, क्लब आणि पबमध्ये पहाटे पाचपर्यंत संगीत वाजविण्याची परवानगी का नाही, अशी विचारणा करीत न्यायालयाने त्यालाही परवानगी दिली. तसेच याबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस तात्काळ कारवाई करतील, असेही बजावले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2014 रोजी प्रकाशित
मुंबईकरांचा नववर्ष जल्लोष पहाटेपर्यंत
नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने मुंबईकरांना सामाजिक ‘नाईटलाईफ’ अनुभवण्याची एकमेव संधी उरलेली असताना त्यालाही वेळेची मर्यादा घालून

First published on: 01-01-2014 at 06:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais new year eve extended till 5 am by court