अनोळखी आरोपींनी एका तरुणाचा त्याच्या घराजवळ तीक्ष्ण व धारदार शस्त्रांनी भोसकून खून केला. उत्तर नागपुरातील देशमुख लेआऊटमधील सिद्धार्थ शाळेमागे रविवारी रात्री साडेअकरावाजेनंतर ही घटना घडली. नागपुरात गेल्या दोन दिवसात झालेला हा तिसरा खून आहे.
शेखर महादेव गुप्ता (रा. सिद्धार्थ शाळेमागे देशमुख लेआऊट, कांजी हाऊस चौक) हे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री तो घरी झोपला असताना त्याचा एक परिचित घरी आला. ‘तुला धम्मदीपनगरची मुले अवजार घेऊन मारण्यासाठी येत आहेत, तु माझ्यासोबत घरी चल’ असे तो म्हणाला. शेखर त्याच्यासोबत गेला. काही मिनिटांनी त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्याचे कुटुंबीय व इतर लोक धावले. तोपर्यंत मारेकरी पळून गेले होते. शेखर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. या घटनेची माहिती मिळाल्यावर यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. शेखरच्या छाती व पोटावर तीक्ष्ण व धारदार शस्त्राचे वार होते. पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. शेखरचे वडील आठवडी बाजारात खाद्य पदार्थ विकायचे. तो मिळेल ती कामे करायचा. काल रात्री तो तिनखेडे लेआऊटमधील एका पानठेल्यावर गेला होता. तेथे त्याची काहींशी भांडण झाले. लोकांनी मध्यस्थी करून ते सोडविले. त्यानंतर तो घरी आला. जेवण करून झोपला होता. त्यानंतर ज्या परिचित तरुणाने त्याला बोलावून नेले तो अनेकदा शेखरकडे यायचा. त्याचे नाव माहिती नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे शेखरचा खून कुणी व का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.  दरम्यान, शहरात खुनांची मालिका सुरूच आहे. बाबुळबनमध्ये एका कुख्यात आरोपीचा घरासमोर रविवारी दुपारी खून झाला. शनिवारी रात्री सैतान चौकात एका कुख्यात आरोपीचा खून झाला.  शुक्रवारी पहाटे मनीषनगरातील एका निर्माणाधीन इमारतीत बारा वर्षांच्या मुलीला जाळण्यात आले. त्याआधी २१ तारखेला कावरापेठेत एका तरुणाचा खून झाला. २० तारखेला महालमधील राणा सन्स बिअर बारसमोर एका कुख्यात गुंडाचा खून झाला.