भारतीय शास्त्रीय संगीत हे हिमालयासारखे भव्य आणि सागरासारखे खोल असून संगीतात माणसा-माणसांमधील धर्म व जाती भेद आणि एकमेकांविषयीची द्वेषभावना दूर करण्याची खूप मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. जसराज यांनी गुरुवारी येथे केले.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा ‘पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार’ पं. जसराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पं. जसराज यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गा जसराज आणि शसी व्यास यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
संगीतात किती ताकद आहे याची एक आठवण पं. जसराज यांनी सांगितली. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेक्यांच्या कारवाया जोरात सुरू होत्या. या मंडळींना भारतापासून वेगळे व्हायचे होते. त्या काळात पंजाबमध्ये माझ्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर कोणीही प्रेमाने माझे स्वागत केले नाहीच; पण व्यासपीठावरून एकाने ‘भारता’मधून कोणी पं. जसराज हे गाण्यासाठी येथे आले आहेत, असे सांगितले. मला गाण्यासाठी ३५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. माझे गायन संपले आणि ज्या माणसाने ‘भारता’मधून कोणीतरी जसराज आले आहेत, असे सांगितले होते, तिनेच व्यासपीठावरून ‘पं. जसराज हे आमचा ‘भारत’ आहेत’, असे जाहीरपणे सांगितले. माणसे जोडणारा हा अनुभव खूप आनंद व समाधान देऊन गेला. संगीत हे सागराप्रमाणे असून माणसाच्या मनातील राग, द्वेष संगीतामुळे कधी आणि कसा दूर होतो, हे कळत नाही, असेही जसराज यांनी सांगितले.
नव्या पिढीविषयी पं. जसराज म्हणाले की, या पिढीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे वरदान मिळाले आहे. आमच्या काळात गुरूंच्या घरी जाऊनच शिकावे लागत होते. आज एखाद्याला गुरूच्या घरी जाऊन शिकणे शक्य नसेल तर तो घरबसल्याही संगीत शिकू शकतो. जगाच्या कोणत्याही देशातील व्यक्तीला तिथे राहूनही भारतीय संगीत शिकता येऊ शकते, इतकी प्रगती झाली आहे. गुरू-शिष्य परंपरा आणि तिचे महत्त्व आहेच; पण ज्याला मनापासून शिकायचे आहे, त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानही खूप मदत करणारे आहे.
पं. जसराज यांच्यावर दुर्गा जसराज यांनी तयार केलेली दृकश्राव्य ध्वनिचित्रफीतही या वेळी दाखविण्यात आली.ं