नवी मुंबई महापालिकेत प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेने सध्या विरोधी पक्षनेतेपदाचा अक्षरश खेळखंडोबा केला असून सर्वाना समान संधी या तत्त्वानुसार मागील अडीच वर्षांत विरोधी पक्षनेतेपदावर तिसऱ्या नगरसेवकाची नियुक्ती करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात सध्या शिवसेना नेत्यांच्या या अजब तर्कटाचे हसे होऊ लागले आहे. आठ महिन्यांपूर्वी या पदावर नियुक्त करण्यात आलेले विजय माने यांनी आपला राजीनामा  सादर केला असून नेरुळ येथील पक्षाचे नगरसेवक दिलीप घोडेकर यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी जाहीर करावे, असे पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी महापौरांना दिले आहे. महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये सावळागोंधळ सुरू असताना प्रमुख विरोधी पक्षातच गोंधळ असल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. या पक्षाचे महापालिकेत ५० पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीखालोखाल शिवसेनेचे नगरसेवक असून त्यांचा आकडा जेमतेम १७ आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याने विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे असले तरी मागील अडीच वर्षांत महापालिकेत या पक्षाची कामगिरी फारशी प्रभावी झालेली नाही. गेल्या अडीच वर्षांत महापालिकेत काही वादग्रस्त कंत्राटे मंजूर झाली असून शिवसेनेचे नगरसेवक याविषयी बघ्याची भूमिका घेताना दिसले. कचरा वाहतूकीच्या सुमारे २३४ कोटी रुपयांच्या वादग्रस्त कंत्राटावर काँग्रेसचे नगरसेवक तुटून पडत असताना शिवसेना नगरसेवक मात्र मूग गिळून होते. आयुक्त भास्कर वानखेडे यांची कार्यशैली काहीशी वादग्रस्त ठरली असून प्रशासनावर फारसा अंकुश नसलेले आयुक्त म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कंत्राटी कामांमधील टक्केवारीने पुन्हा एकदा मान वर काढली असून काही बडे नेते तर कंत्राटदारांकडून उघडपणे पाच टक्के मागत असल्याची अभियंता विभागात चर्चा आहे.
सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटविण्यासाठी अतिशय पोषक वातावरण असतानाही शिवसेना नगरसेवकांना फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. या पाश्र्वभूमीवर अडीच वर्षांत दोन वेळा विरोधी पक्षनेते पदावरील व्यक्ती बदलण्याची नामुष्की शिवसेना नेत्यांवर आली आहे. पहिल्या वर्षांत या पदावर नियुक्त केलेले ऐरोलीतील नगरसेवक मनोज हळदणकर यांची चांगली पकड बसत असताना त्यांना बदलून कोपरखैरणे येथील विजय माने यांची नियुक्ती करण्यात आली. माने यांना जेमतेम आठ महिने पूर्ण होत असताना त्यांनाही बदलण्यात आले असून दिलीप घोडेकर यांची यापदासाठी नियुक्ती करण्यात यावी, असे पत्र विजय चौगुले यांनी महापौरांना दिले आहे. पक्षात सर्वाना संधी मिळावी यासाठी या पदावरील व्यक्ती बदलण्यात येत आहे, असा खुलासा सध्या शिवसेनेचे नेते करत आहेत. मात्र, कामकाजावर पुरेशी पकड मिळविण्याआधीच पदावरील व्यक्ती बदलली जात असल्याने महापालिकेत शिवसेना नगरसेवक गोंधळाच पडले आहेत.