मद्य, बिअर पिऊन झिंगलेली तरुणाई मध्यरात्री उशिरापर्यंत पबमध्ये थिरकल्यानंतर बेधुंद अवस्थेत पबबाहेर पडत असल्याची दृश्ये आता नागपूर शहरासाठी नवीन राहिलेली नाहीत. वेस्ट हायकोर्ट रोडवरील एका बडय़ा पबमध्ये शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कामठी मार्गावरील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पार्टी बेधडक सुरू होती. साधारण साडेबारा वाजताच्या सुमारास नशेची ‘किक’ जरा जास्तच झाल्याने एखादा बाका प्रसंग उद्भवू नये म्हणून सगळ्यांना बाहेर काढण्याची सूचना देण्यात आली. मद्याच्या पाटर्य़ामध्ये बरेचदा भांडणे, मारामाऱ्यादेखील होतात. त्यामुळे अशांना आवरण्यासाठी आता ‘बाऊंसर्स’ तैनात केले जात आहेत. बार, पब, रेस्टॉरंट, बडय़ा हॉटेलांमध्ये काळ्या गणवेशातील दणकट ‘बाऊंसर्स’ बरेचसे असे प्रसंग हाताळण्यासाठीच ठेवले जातात. जिममध्ये जाऊन पीळदार शरीरयष्टी कमाविलेलेले तरुण आता बाऊंसरची नोकरी स्वीकारण्यात कमीपणा मानत नाहीत. कमी शिकलेले आणि पदवीधर झालेले तरुणही या प्रोफेशनमध्ये उतरू लागले आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्टीत नशा केलेल्या मुली तोकडय़ा कपडय़ात अक्षरश: झिंगत होत्या. त्यांच्याने एक एक पाऊल पुढे टाकणेदेखील कठीण झालेले.. त्यांना त्यांचे ‘बॉयफ्रेण्ड’ आधार देऊन कारमध्ये अक्षरश: कोंबत होते. कशाचेच काही भान नसलेल्या या तरुणाईची ही अवस्था पाहणारेही चकित होत होते. त्यावेळी रस्त्यावर फार वर्दळ नव्हती. परंतु, येणारे-जाणारे वाहने थांबवून हा तमाशा पाहत होते.. या वाहनधारकांना पबमधील दोन बाऊंसर्स ‘जल्दी निकलो’ म्हणून इशारे करीत होते. हा गोंधळ सुरू असताना पोलिसांची एक गाडी सायरन वाजवत तेथे आली. ‘साब सब खत्म हो गया’, सब निकल गये, म्हणून पोलिसांनी खात्री करून घेतली आणि गाडी काही क्षणातच पुढे निघूनसुद्धा गेली.
 वर्धमान नगरातील लगून ब्लू पबमध्ये काही दिवसांपूर्वी पोलिसांनी धाड टाकून ४५ मुला-मुलींना बेधुंद अवस्थेत पकडले होते. हा प्रसंग अद्याप लोक विसरलेले नाही. परंतु, पब संस्कृती शहरात झपाटय़ाने पसरू लागल्याचे आता स्पष्ट झाले असून तरुणाईला बिघडवण्याचे कंत्राट घेतलेले पब मालक आता घट्ट पाय रोवू लागले आहेत. महाविद्यालयीन मुला-मुलींना पबमधील पाटर्य़ाचे निमंत्रण सांकेतिक भाषेत पाठवून मॉब गोळा करायचा. यातून गल्ला भरायचा आणि तरुणाईला व्यसनाधीन होण्याची चटक लावायची, ही प्रवृत्ती आता बोकाळू लागली आहे. काही वर्षांपूर्वी महानगरात पबचे फॅड होते. आता नागपूरसारखी शहरेही याला अपवाद राहिलेली नाहीत. त्यामुळे बाका प्रसंग हाताळण्यासाठी बाऊंसर्स ठेवल्याशिवाय पर्याय नाही. पबच्या प्रवेशद्वारावर, लाऊंजमध्ये, पार्टी हॉलमध्ये अगदी जागा हेरून हे बाऊंसर्स उभे असतात. सुरक्षा रक्षकांपेक्षा बाऊंसर ठेवणे परडणारे असल्याने बेरोजगार तरुण या नोक ऱ्या मिळविण्यासाठी भटकत असतात. बाऊंसर्सच्या उपस्थितीत भांडणे होत नाहीत, असेही नाही. बरेचदा वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. एखाद्याला मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. शुक्रवारी असे सुदैवाने घडले नाही.