िहगोलीत साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नांदेडातील दहशतवाद विरोधी पथकाने गुरुवारी िहगोलीत तळ ठोकला. याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली असली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून पथकाने अनेक पोलीस अधिकाऱ्यांना काही सूचना केल्याचे कळते.
लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर देशभरातील ५० शहरे अतिसंवेदनशील असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर विभागाने दिला होता. यामध्ये नांदेडचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यालगत िहगोली, परभणी शहरेही संवेदनशील मानली जातात. परभणी, नांदेडमध्ये दहशतवादी कारवायांची नोंदही आहे. सार्वजनिक ठिकाणी दहशतवादी कृत्य घडू नये, यासाठी एटीएसने वेगवेगळय़ा उपाययोजना सुरू केल्या आहेत. गर्दी होणाऱ्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून आवश्यक माहिती गोळा करून एटीएसचे अधिकारी काही सूचना देत आहेत. मराठवाडय़ात िहगोली येथे सर्वात मोठा व ऐतिहासिक दसरा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवास मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. महोत्सवादरम्यान स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तनात केला जातो.
िहगोलीतील दसऱ्याच्या पाश्र्वभूमीवर वरिष्ठ कार्यालयाकडून काही सूचना प्राप्त होताच नांदेड एटीएसचे पोलीस उपअधीक्षक बेद्रे गुरुवारी पथकासह िहगोलीस गेले. दसरा महोत्सव साजरा केला जातो, त्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली व स्थानिक पोलिसांकडून माहिती घेऊन काही सूचनाही केल्याचे समजते. एटीएसने िहगोलीस का भेट दिली, याबाबत अधिकृत तपशील मात्र समजू शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ खबरदारीचा उपाय म्हणून एटीएस सध्या अशाप्रकारे भेटी देऊन माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या संदर्भात पोलीस उपअधीक्षक बेद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.