येथील भुजबळ फाऊंडेशनच्यावतीने ४ ते १८ जानेवारी या कालावधीत चौथ्या ‘नाशिक फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांसह चित्रकला, रांगोळी, भजन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबत प्रथमच विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘नाशिक रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या बाबतची माहिती फाऊंडेशनचे खा. समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. गत वर्षी दुष्काळाचे सावट असल्याने महोत्सवाला फाटा देत जिल्ह्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्यात आला होता. या माध्यमातून ३५ ठिकाणी ९ लाख २० हजार घनमीटर गाळ उपसून जल संधारणाची कामे करण्यात आली. नैसर्गिक स्त्रोत खोलीकरण, रुंदीकरण करून गाळ काढण्यात आल्याचे आ. जयंत जाधव यांनी सांगितले. यंदा महोत्सवाची बुध्दिबळ स्पर्धेने होणार आहे.
४ व ५ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर १३ वर्षांखालील व खुल्या गटात ही स्पर्धा होईल. ७ ते १२ जानेवारी दरम्यान बॅडमिंटन स्पर्धा हं. प्रा. ठा कला महाविद्यालयामागील नाशिक जिमखान्यात होणार आहेत. ९ जानेवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता शरीरसौष्ठव स्पर्धा दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे.
तसेच याच कालावधीत नाशिक जिमखाना येथे कॅरम, १० ते १४ जानेवारी दरम्यान राजे संभाजी स्टेडियम, सातपूर क्लब हाऊस, शिखरेवाडी, नाशिकरोड येथील महापालिका शाळा क्र. १२५ या मैदानावर क्रिकेट स्पर्धा होईल. १५ जानेवारी रोजी महात्मा नगर मैदानावर अंतिम सामने होतील. १२ जानेवारी रोजी १४ ते १९ वर्षे वयोगटासाठी नाशिक-कसारा-नाशिक सायकल स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेत्यास ‘घाटाचा राजा’ हा किताबासह रोख स्वरूपात पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महिलासांठी कमी अंतराची नाशिक-घोटी-नाशिक अशी सायकल स्पर्धा होईल.
या शिवाय, छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे कबड्डी, खो-खो तसेच यशवंत व्यायाम शाळा येथे व्हॉलिबॉलच्या स्पर्धा होणार आहेत. सावरकर जलतरण तलावात जलतरण स्पर्धा होईल. तसेच रोलर स्केटींग, कुस्ती स्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा, भजन स्पर्धा, फुड फेस्टिवल हाटबाजार, हॅण्डीक्राफ्ट, ग्रंथजत्रा, ठिकठिकाणी नेत्र चिकित्सा शिबीर आदी उपक्रम होतील. महोत्सवाचे आकर्षण असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम १४ ते १८ जानेवारी कालावधीत होणार आहेत.
१४ जानेवारी रोजी गांधी तलावावर इन्स्ट्रुमेंटल फ्युजन, गांधी तलावावर सप्तसूर, मराठी चित्रपटातील तारकांचा प्रवास, बी. डी. भालेकर मैदानावर कव्वालीचा कार्यक्रम रंगणार आहे. महोत्सवाचा समारोप १८ जानेवारी रोजी ग्रँड फिनालेने गोल्फ क्लब मैदानावर होईल. महोत्सवात प्रथमच कला, क्रीडा, समाजसेवा, शिक्षण, शेती आणि उद्योग या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या व्यक्तींना ‘नाशिक रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.