बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात थेट बॉम्बसदृश वस्तू पाठवत घबराट पसरविण्याच्या घटनेला चोवीस तासांचा कालावधी उलटून गेला असला तरी पोलीस यंत्रणेला ठोस असे काही हाती लागलेले नाही. दुसरीकडे कार्यालयात पाठविलेली संशयास्पद वस्तू बॉम्ब होती, असे बॉम्बशोधक व नाशक पथकाचे म्हणणे असले तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र त्यास नकार दिला. यामुळे पोलीस यंत्रणेत संशयास्पद वस्तुबाबत मतभिन्नता असल्याचे अधोरेखित झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खास पोलीस पथके तैनात करून संशयिताचा शोध घेतला जात असला तरी अद्याप कोणाला ताब्यात घेण्यात आलेले नाही. सुयोजित बिल्डटेकच्या संचालकांना काही वर्षांपूर्वी खंडणीसाठी धमकीचे दूरध्वनी आले होते. पण, अलीकडच्या काळात तसा काही प्रकार घडला नसल्याची माहिती त्यांनी पोलीस यंत्रणेला दिली आहे.
शरणपूर रस्त्यावरील पालिका मुख्यालयासमोर सुयोजित ट्रेड सेंटरमध्ये बांधकाम व्यावसायिक अनंत राजेगावकर यांचे सुयोजित बिल्डकॉन कार्यालयात बुधवारी दुपारी दीड वाजता युवकाने बॉक्स आणून ठेवला होता. काही वेळाने कार्यालयात निवावी दूरध्वनी आला आणि त्यावरून साहेबांना बॉक्स दिला की नाही, तो उघडून पाहिला काय, अशी विचारणा केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. बॉम्बशोधक व नाशक पथकाने बॉक्सची तपासणी केली तेव्हा त्यात १२५ मिलिलिटर पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत भरलेले होते. त्याच्या शेजारी बॅटरी, वायर आणि सर्किटही जोडलेले असल्याचे निदर्शनास आले. हा बॉम्ब निकामी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तथापि, ही निव्वळ बॉम्बसदृश वस्तू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले होते. या संशयास्पद वस्तू तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्या आल्या आहेत. सीसी टीव्ही चित्रणाआधारे बॉक्स ठेवणाऱ्या संशयिताचा शोध घेतला जात आहे.
शहर व परिसरात मालमत्तेच्या किमतींमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. मालमत्तेवरून वाद होण्याचे प्रकारही वाढले आहेत. या घटनेमागे मालमत्तेशी संबंधित काही वाद आहे काय याची छाननी पोलीस यंत्रणा करीत आहे. काही वर्षांपूर्वी सुयोजित बिल्डरचे संचालक अनंत राजेगावकर आणि अनिल जैन यांना खंडणीसाठी धमकावले गेल्याचे सांगितले जाते. सध्या या स्वरूपाच्या कोणत्याही धमक्या आली नसल्याचे संबंधितांनी पोलीस यंत्रणेला सांगितले आहे. याबाबतची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या प्रकरणी अद्याप कोणाला ताब्यात घेण्यात आलेले नाही. वेगवेगळ्या शक्यता पडताळून तपास केला जात असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2015 रोजी प्रकाशित
तपासात वेगवेगळ्या शक्यतांची पडताळणी
बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात थेट बॉम्बसदृश वस्तू पाठवत घबराट पसरविण्याच्या घटनेला चोवीस तासांचा कालावधी उलटून गेला असला
First published on: 27-02-2015 at 07:43 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik news