राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयात १९ ते २३ फेब्रुवारीपर्यंत ‘जस्टा कॉजा’ हा बारावा राष्ट्रीय विधि उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या विधि उत्सवाचे उद्घाटन १९ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून विधी विभागाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली हस्तक, ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. २१ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रास विशेष अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. आय.जे. राव, पाटणा येथील चाणक्य राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. लक्ष्मीनाथ व नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमासे राहतील. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेशकुमार येंकी राहतील.
२२ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता महाराजबागेजवळील विद्यापीठ कार्यालयाच्या दीक्षांत सभागृहात भोंडे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानास प्रमुख वक्ते म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गोखले उपस्थित राहतील.
प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही.एस. सिरपूरकर, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ राहतील.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. विलास सपकाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती व्ही.एस. सिरपूरकर उपस्थित राहतील.