नवापूर पालिकेत १८ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळविणाऱ्या काँग्रेसकडून नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, ही चर्चा सध्या सुरू आहे. अडीच वर्षांकरिता इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी हे पद आरक्षित झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी प्राध्यापिका ज्योती जयस्वाल, दर्शनाबेन राणा आणि मेघा जाधव या तिघींमध्ये चांगलीच चुरस आहे.माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष रमेशचंद्र राणा उर्फ रमलाभाई राणा हे पाचवेळा निवडून आल्यानंतरगी ते नगराध्यक्ष होऊ शकले नाही.यावेळी नगराध्यक्षपद महिला राखीव झाले. त्यामुळे यंदाची निवडणूक राणा यांनी स्वत न लढवता आपली सून दर्शना राणा यांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळवून देत त्यांना निवडूनही आणले. दर्शना राणा यांना अनुभवही नाही. परंतु राणा हे त्यांच्यासाठी अटोकाट प्रयत्न करतील.
नगराध्यक्षपदाच्या दुसऱ्या दावेदार ज्योती जयस्वाल या प्राध्यापिका असून पती दीपक जयस्वाल हेही प्राध्यापक आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, खासदार माणिकराव गावित, शिरीष नाईक, भरत गावित तसेच माजी नगराध्यक्ष उद्योगपती विपीन चोखावाला यांच्याशी त्यांची जवळीक असल्याने त्यांची बाजू  सध्यातरी वरचढ वाटते. तिसरा पर्याय म्हणून मेघा जाधव यांचे नाव पुढे आले आहे. त्यांचे पती हेमंत जाधव पत्रकार असून त्यांचेही शिरीष नाईक, भरत गावित यांच्याशी संबंध आहेत.