नदीजोड प्रकल्पाची नव्याने सुरू असणारी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची मॅचफिक्सिंग असल्याचा आरोप राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष एच. एम. देसरडा यांनी केला आहे. साखर कारखाने, मद्यार्क कारखाने व अन्य उद्योगांचे पाणी बंद करावे, अशी भूमिकाही त्यांनी पत्रकार बैठकीत मांडली.
सध्या मराठवाडय़ात दुष्काळी पर्यटनाचा कहर सुरू असून फक्त सवंग राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे. धोरणात्मक निर्णय होत नसल्याची टीका देसरडा यांनी केली. जमीन, पाणी, वने व जैवविविधता यावर आघात करणाऱ्या विकासनीतीमुळे दुष्काळ निर्मूलन होणार नाही. दुष्काळ निवारणाकडून निर्मूलनाकडे जाण्यासाठी पाणलोट विकास हे ठोस उत्तर मान्य व्हायला हवे, असेही ते म्हणाले.
साखर, मांस, मद्यार्क, रसायने, ऑटोमोबाइल्स, जलतरण तलावांसाठी होणारा पाणीपुरवठा बंद करावा, ऊस, केळी, द्राक्षे या पिकांच्या अफाट पाणीवापरावर मर्यादा घालावी, बांधकाम परवाने ऑगस्ट २०१३ पर्यंत देणे तहकूब करावे, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. दुष्काळाच्या नावाने कंत्राटदार व त्यांच्या पाठीराख्या पुढाऱ्यांनी संपत्ती गोळा करायला सुरुवात केली आहे. पाण्याचे लोकाभिमुख नियोजन आणि वितरण करणे शक्य आहे. मात्र, तसा धोरणात्मक निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती सत्ताधाऱ्यांनी दाखवावी, असेही ते म्हणाले. सोयाबीन आणि बीटी कॉटनमुळे जमिनीतील ओल टिकण्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि बहुतांश साखर कारखाने मराठवाडय़ात असल्याने पाण्याचा उपसा वाढला आहे.त्यावर र्निबध लावायला हवे. धोरण न ठरवता नदीजोड प्रकल्पाची चर्चा म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीची मॅचफिक्सिंग असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.