जल आणि मल वाहिन्या टाकताना नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांची झालेली चाळण पूर्वपदावर आणण्यासाठी नवी मुंबई पालिकेने बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत एकाच वेळी २७ रस्ते दुरुस्तीची सुमारे २७ कोटी रुपये खर्चाची कामे मंजुरीसाठी पटलावर ठेवली आहेत. नवी मुंबईतील बहुतेक अंतर्गत रस्त्यांवर गाडी चालवताना समुद्रात हेलकावे खाणारी बोट चालविण्याचा अनुभव येतो. आता पालिका लोकसभा निवडणुकीपूर्वी हे सर्व रस्ते दुरुस्त करून सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाला फील गुड वातावरण निर्माण करुन देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांना मधोमध खोदून त्या ठिकाणी जल व मल वाहिन्या टाकण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. हे काम आता पूर्णत्वास आले असून या रस्त्यांची झालेली चाळण ठीकठाक करण्यासाठी आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी एकाच वेळी २७ रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे बुधवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी ठेवली आहेत. ही सर्व कामे सरासरी एक कोटी रुपये खर्चाची असून कोपरखैरणे विभागात सर्वाधिक कामे काढण्यात आली आहेत. या कोटय़वधी रुपयांच्या कामांमुळे अनेक नगरसेवकांचे टक्केवारीच्या नावाने चांगभलं होणार असून काम केल्याचे समाधानही मिळणार आहे. वाशी विभागात अशी चार कामे असून त्यांचा खर्च पावणेतीन कोटी रुपयांच्या घरात आहे. कोपरखैरणे भागात साडेचार कोटी रुपये खर्चाची कामे काढण्यात आलेली आहेत. यानंतर बेलापूर, नेरुळ, तुर्भे, घणसोली. तळवली आणि ऐरोली येथील कामांचा समावेश आहे. रस्ते बांधताना सर्वसाधारणपणे प्रथम तीन ते चार इंच खोदकाम करणे, त्यानंतर बीटुमिनियस मॅकाडम (बीएम) बिटुमिनियस बॉन्ड मॅकाडम (बीबीएम), टय़ाक कोट अशा पाच ते सहा प्रकारे रस्ते बांधता येतात, पण नवी मुंबईत ‘सब घोडे बारा टक्के’ अशा हिशोबात रस्ते बांधले जात असल्याने त्यांच्या पुनर्बाधणीची कामे प्रत्येक वर्षांला निघत आहेत. रस्ता खोदल्यानंतर त्या ठिकाणी परिस्थितीनुसार ६,१२,४० इंच जाडीची खडी टाकून हा रस्ता पक्का करण्याची पद्धत आहे, पण या प्रक्रियेला फाटा देण्यावरच कंत्राटदारांचा जास्त कल असल्याचे दिसून आले आहे. मोठय़ा प्रमाणात द्याव्या लागणाऱ्या टक्केवारीमुळे असे न केल्यास ही कामे परवडणे शक्य नाही, असे एका कंत्राटदाराने सांगितले. ही कामे घेणाऱ्यांची पालिकेत एक मक्तेदारी असून पालिकेत ई टेंडरिंग केवळ नावाला शिल्लक आहे. येथे सर्व कामे मॅनेज केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे या रस्त्यांची देखरेख करणाऱ्या अभियंत्याला पटवल्यास पूर्ण अहवाल मनासारखे दिले जात आहेत. त्यामुळे  नवी मुंबईतील अनेक रस्त्यांची दुरुस्ती आणि पुनर्बाधणी वादग्रस्त आहे.
गणेशोत्सवातील रस्ता उखडला
 ऐरोली सेक्टर आठ (यश पॅराडाइजजवळील) येथे गणेशोत्सवानंतर बांधण्यात आलेला रस्ता आत्ताच उखडला जाऊ लागला असून या रस्त्याची बांधणी योग्य पद्धतीने न झाल्याने पुनर्बाधणीनंतर रस्त्याची उंची वाढली आणि जवळच्या दुभाजकाची उंची कमी झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर पाण्याचा हौद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी अशा कामांकडे जाणूनबूजून दुर्लक्ष करीत असल्याने या ठेकेदारांचे फावत असल्याचे दिसून येते.
लक्ष्मीदर्शनामुळे रस्ते नित्कृष्ट
  कामे घेताना ठेकेदार वरपासून खालपर्यंत सर्वाना टक्केवारीच्या स्वरूपात लक्ष्मीदर्शन घडवीत असल्याने रस्त्यांची ही कामे निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना ठरत आहेत. नवीन आयुक्तांचा कामाच्या जागी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याकडे जास्त कल आहे. तो किती दिवस टिकतो, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.