यात्रोत्सव, गरबा अन् दांडियाच्या जल्लोषपूर्ण वातावरणात चाललेल्या नवरात्रोत्सवाची रविवारी सीमोल्लंघनाद्वारे सांगता होणार असून दसऱ्याच्या आदल्या दिवशी शहर व परिसरात झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा चांगल्या पावसामुळे झेंडूच्या फुलांचे भाव आटोक्यात राहण्याची चिन्हे आहेत. महागाईमुळे दसऱ्याच्या दिवशी खरेदीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रावण दहनाच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
दसरा म्हणजे सीमोल्लंघन. हा मुहूर्त साधून नवीन खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. वाहन, घर, सोने यांसह गृहोपयोगी वस्तू व तत्सम खरेदी या काळात अधिक होत असल्याने व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचे पेटारे उघडले आहेत. दीपावलीची चाहूल देणारा हा सण असल्याने व्यावसायिकांनी त्या अनुषंगाने जय्यत तयारी केली आहे. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना अधिक मागणी राहत असल्याने दोन दिवस आधीपासूनच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणावर झेंडू दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या फुलांसाठी साधारणत: ५० ते ७० रुपये शेकडा दर राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
नवरात्रोत्सवाच्या समाप्तीस अवघा एकच दिवस बाकी राहिल्याने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीसह नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवी, भगूर व चांदवडची रेणुका माता, कोटमगावची जगदंबा, साक्री तालुक्यातील धनदाई व म्हसाई देवी आदी ठिकाणी दर्शन आणि यात्रोत्सवात भाविकांची गर्दी लक्षणीय वाढली आहे. दुसरीकडे गुजराती संगीताच्या ठेक्यावर घागरा चोली आणि काठीयावाडी पेहराव करून धरलेला ताल.. लयबद्ध थिरकणाऱ्या पावलांना दांडिया आणि टाळ्यांची मिळणारी साद.. अशा जल्लोषपूर्ण वातावरणात गरबा व दांडिया रासमध्ये अनोखे रंग भरले गेल्याचे दिसत आहे. यंदा रासच्या आयोजनाचे प्रमाण कमी असले तरी राजकीय पक्षांशी संबंध नसणाऱ्या इतर संस्था व संघटनांनी नेहमीप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करत ही परंपरा कायम ठेवली आहे.