रविवारी सायंकाळनंतर बेपत्ता झालेल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीमधील नऊ वर्षांच्या मुलाचा मृतदेह एका बंद कारमध्ये मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या संशयास्पद प्रकरणाचा सीताबर्डी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अमरावती मार्गावरील म्हाडा संकुलाशेजारी मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वसंतराव नाईक झोपडपट्टीमधील मुले खेळत होती. तेथे एका उभ्या कारकडे (एमएच/०१/ईए/५२६२) लक्ष गेले. आत मुलगा पडलेला दिसला. बारकाईने पाहिले असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड करून नागरिकांना बोलावून घेतले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सीताबर्डी पोलीस तेथे पोहोचले. कारच्या स्टिअरिंगजवळ लहान मुलाचा मृतदेह पडलेला दिसला. पोलिसांनी कारचे दार उघडून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह कुजलेला असल्याने त्यातून दरुगधी सुटली होती. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या उमेश उर्फ बाबुराव मेहीलाल गुप्ता या नऊ वर्षांच्या बालकाचा मृतदेह असल्याचे नागरिकांनी ओळखले. पोलिसांनी मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठविला.
उमेशचा मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. शनिवारी दुपारी उमेश हिस्लॉप महाविद्यालयाच्या मैदानाजवळ इतर मुलांसह खेळत होता. काहीवेळानंतर तो मुलांना दिसला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. सीताबर्डी पोलिसांना कळविले. पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. उमेशचा मृत्यू कशाने झाला, हे शवविच्छेदनाअंती स्पष्ट होणार आहे. ज्या कारमध्ये मृतदेह सापडला ती कार म्हाडा संकुलाच्या आवारात एकीकडे भिंतीजवळ अनेक दिवसांपासून उभी होती. त्याचे बॉनेट उघडे होते. कार मालकाचा पोलिसांनी लगेचच शोध सुरू केला. उमेशचा मृतदेह येथे आला कसा, आदी प्रश्न पोलिसांसमोर आहेत.c