जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह प्रल्हाद मित्रगोत्री यांच्यावर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. मित्रगोत्री यांना परत पाठविण्यासंबंधी ही प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले. जि. प. अध्यक्षांकडे सदस्यांनी आपल्या सह्य़ांचे निवेदन सादर केले. जि.प. उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, अ‍ॅड. बाळासाहेब जामकर, दादासाहेब टेंगरे आदींसह ५२ पैकी ३४ सदस्यांच्या निवेदनावर सह्य़ा आहेत.
जि. प. पदाधिकारी व सदस्यांना मित्रगोत्री विश्वासात घेत नाहीत. नकारात्मक भूमिका घेऊन काम करीत असल्याने सर्व विकासकामे थांबली आहेत, असा आरोप निवेदनात केला आहे. मित्रगोत्री यांच्यावर अविश्वास ठराव संमत करण्यासाठी जि. प.ची विशेष सभा आयोजित करण्याची विनंती या सदस्यांनी अध्यक्षांकडे केली.
जिल्ह्य़ात कुपोषणमुक्त प्रसूती होण्याची गरज लक्षात घेता सरकारने दिलेल्या नियत व्ययाचा खर्च न होणे, पाणीटंचाईचे सावट असताना जिल्हास्तरावर कोणतेही नियोजन न करणे, जल व्यवस्थापनाचा गेल्या तीन वर्षांतील अखर्चित निधी खर्चण्यास आढळून आलेली असमर्थता, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेसंबंधी जिल्ह्य़ात कामांबाबत तक्रारी येऊनही संबंधितांवर न झालेली कारवाई अशी अनेक कारणे सदस्यांनी मित्रगोत्रींविरुद्ध निवेदनात दिली आहेत.
अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सतत दबाव असल्याने निर्णय घेण्यात विलंब असल्याच्याही तक्रारी या सदस्यांनी केल्या आहेत. काही सदस्य बाहेरगावी असल्याने त्यांच्या सह्य़ा होऊ शकल्या नाहीत, असे सांगण्यात आले. मित्रगोत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.