अक्षय्य तृतीयेला अपेक्षित असलेली सराफा पेढय़ांची उलाढाल यंदा मात्र फुसका बार ठरल्याचे चित्र आहे. एलबीटी विरोधी संपामुळे गेल्या २१ दिवसांपासून बाजारपेठा बंद होत्या. व्यापारी संघटनेने बंदला तात्पुरती स्थगिती दिल्याने रविवारपासून सुरू झालेल्या सराफा बाजारात गर्दी दिसून आली परंतु, प्रत्यक्षात अपेक्षित खरेदीचा आकडा गाठण्यात आलेला नाही. बंदमुळे दुकानांमध्ये उसळणाऱ्या गर्दीची शक्यता लक्षात घेता सोने-चांदी-हिरे खरेदीदारांनी शेजारच्या जिल्ह्य़ांमधून खरेदीला प्राधान्य दिल्याने ही स्थिती उद्भल्याचे समजते.
अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदीचे अत्यंत महत्त्व आहे. विवाह मुहूर्तांनाही उधाण येते. त्यामुळे काहींची खरेदी पूर्वीच आटोपली होती तर काहींनी शेजारच्या शहरांमधील सराफा दुकानांमध्ये जाऊन खरेदी केली. खंडेलवाल ज्वेलरी शो रुमचे व्यवस्थापक चेतन खंडेलवाल यांनी खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे मान्य केले. मोठी खरेदी करणारी कुटुंबे हैदराबाद, मुंबई आणि रायपूर या शहरांमधून मालाची खरेदी करून आली त्यामुळे नागपुरात खरेदीचा ओघ कमी राहिला असेही त्यांनी सांगितले. एलबीटीविरोधी मार्केट बंदचा परिणाम सोने विक्रीवर झाल्याचेही त्यांनी मान्य केले. कमी कॅरेटचे सोने विकले गेले परंतु, बडे खरेदीदार मात्र पाहिजे त्या प्रमाणात वळले नाहीत, याचा त्यांनी उल्लेख केला.
त्रिभुवनदास भीमजी जव्हेरीच्या धरमपेठ शो रूमचे भावेश सेठ म्हणाले, दिवाळी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया या दिवशी सराफा पेढय़ांना मोठय़ा विक्रीची अपेक्षा असते. यापैकी अक्षय्य तृतीया हा अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त असल्याने त्या दिवशीची उलाढाल अन्य दिवसांपेक्षा मोठी असते. किमान ४ ते ५ टक्के अधिक सोने खरेदी या दिवशी केली जाते. सोन्याच्या किंमती गेल्या २० दिवसांपासून स्थिर असल्याने मोठी गर्दी उसळेल अशी अपेक्षा होती परंतु,  एलबीटी बंदमुळे अपेक्षित उलाढालीचा आकडा गाठण्यात आलेला नाही. यावेळी छोटय़ा सराफा पेढय़ांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले.
अक्षय्य तृतीयेनिमित्त एनसीव्हीसीसी व एलबीटीविरोधी संर्घष समितीने एलबीटीचा विरोध कायम ठेवून १५ मे पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आल्याने ग्राहक तसेच दुकानदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. सीताबर्डी, महाल बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी रविवारपासून प्रचंड गर्दी उसळली आहे. इतवारी किराणा, धान्य बाजारात पाय ठेवायलाही जागा नव्हती, अशी आणीबाणीची परिस्थिती होती. घाऊक दुकानदार बाजारात माल विक्रीपेक्षा गोदामात माल भरण्यावरच अधिक भर देत असल्याचे चित्र होते. रविवारी सुटीचा दिवस असूनही सीताबर्डी परिसरातील बरीचशी दुकाने उघडण्यात आली. रविवारी फुटपाथवरील कपडे, चपला अन्य वस्तूंचा बाजारही जोरात होता. इतवारीतील सराफा बाजार सुरू होता परंतु फारसे ग्राहक नव्हते. हातठेलाचालक,  रिक्षाचालक, माथाडी कामगार पाठीवर पोते घेऊन किराणा, धान्य गोदामात माल भरताना दिसले. कामगारांचा तीन दिवस का होईना रोजीरोटीचा प्रश्न तात्पुरता सुटला. येत्या १६ मे पासून बेमुदत व्यापारबंद आंदोलनाला सुरुवात होणार असल्याने ग्राहक सावध झाला आहे.