काल्पनिक कथा-कादंबऱ्यांच्या लोकप्रियतेशी तुलना करता वास्तवदर्शी कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक फार कमी वेळा वाचकांपर्यंत पोहोचतात. वास्तवदर्शी लिखाण हे किती प्रकारचे असू शकते आणि त्याचे त्या त्या काळानुरूप असणारे महत्त्व लक्षात घेऊन असे लिखाण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागील वर्षीपासून ‘नॉन फिक्शन फेस्ट’ या आगळ्यावेगळ्या साहित्यिक महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. या महोत्सवाचे दुसरे पर्व २४ जानेवारीपासून नेहरू सेंटर येथे सुरू होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक कुमार यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना दिली.
 तत्कालीन घटना, त्यावेळची सामाजिक-राजकीय परिस्थिती याचे खरेखुरे प्रतिबिंब हे वास्तवदर्शी लिखाणात उमटलेले असते. त्यामुळे वाचक आपोआप सत्याशी जोडला जातो. शिवाय, या लिखाणाचे कितीतरी उपप्रकार आहेत ज्यांना आजपर्यंत कधीही साहित्याच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे वास्तवदर्शी लिखाण करणाऱ्या लेखकांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने या महोत्सवाचा घाट घातल्याचे कुमार यांनी सांगितले. नेहरू सेंटरमध्ये २४ जानेवारीपासून या महोत्सवाचा शुभारंभ होणार असून २६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध विषयांवरच्या परिसंवादांचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘इंडिया : अवर टाइम इज नाऊ’ या परिसंवादात दिग्दर्शक किरण राव सहभागी होणार असून एकू णच आजची युवा पिढी, सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती, त्यांच्या महत्वाकांक्षा आणि उद्योजकता अशी विविधांगी चर्चा या परिसंवादात होणार आहे. ‘नॉन फिक्शन फेस्ट’च्या निमित्ताने वास्तवदर्शी लिखाण करणाऱ्या लेखकांना वाचकांबरोबरच थेट प्रकाशकांबरोबरही संवाद साधता येणार आहे. प्रकाशक, ग्रंथालयाचे अधिकारी यांना भेटून आपले साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कुमार यांनी दिली.
नवीन पुस्तके
महोत्सवात मिन्हाझ र्मचट लिखित ‘द न्यु क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन – हाऊ द काँटेस्ट बिटवीन अमेरिका, चायना, इंडिया अँड इस्लाम विल शेप अवर कन्ट्री’, संदीप गोयल लिखित ‘काँजो : द फायटिंग स्पिरीट’, सुरज श्रीराम यांचे ‘एक्स्क्यूज मी कॅन वुई हॅव अवर कंट्री बॅक’, अभिनेत्री टिस्का चोप्रा लिखित ‘अ‍ॅक्टिंग स्मार्ट : युवर तिकीट टु शोबीझ’, सुमीत चौधरी लिखित ‘रूल्स ऑफ गेम’, लक्ष्मी धौल यांचे ‘मॅजिक मंत्राज : फॉर यंग अ‍ॅडल्ट्स टू अचिव्ह सक्सेस इन लाइफ’ आणि संजय कुमाल लिखित ‘इंडियन युथ अँड इलेक्टोरल पॉलिटिक्स : अ‍ॅन एमर्जिग एंगेजमेंट’ या नवीन पुस्तकांची ओळख करून देण्यात येणार आहे.