तीन महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचा पत्ता नाही, तसेच ग्रामपंचायतीकडे निधी वर्ग होऊनही तीन अंगणवाडय़ांचे बांधकाम अपूर्णच असल्याने अंगणवाडीतील मुलांसह सेविकांची मोठी परवड होत आहे. औंढा नागनाथ तालुक्याच्या जवळाबाजार येथील अंगणवाडीतील अशा विविध समस्यांकडे संबंधित यंत्रणेचेही दुर्लक्ष झाले आहे.
जवळाबाजार ग्रामस्थांनी या बाबत तक्रारीत म्हटले आहे, की गावातील अंगणवाडी क्रमांक सहामध्ये १९० विद्यार्थी आहेत. या अंगणवाडीला प्रतीक्षा महिला गटामार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जात असे. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला नाही. अंगणवाडी सेविकांच्या वतीने या बाबत पर्यवेक्षिका यांच्याकडे लेखी तक्रार दिली. मात्र, दखल घेतली जात नाही.
येथील तीन अंगणवाडय़ांच्या बांधकामासाठी प्रत्येकी ३ लाख १० हजार रुपये निधी ग्रामपंचायतीकडे जमा आहे. यात क्रमांक पाचच्या अंगणवाडीचे काम अध्र्यावरच रखडले आहे. क्रमांक सहाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे, तर क्रमांक सातच्या अंगणवाडी बांधकामास आलेले साहित्यच गायब झाले आहे. या सर्व प्रकारांची वरिष्ठांनी जातीने चौकशी करावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.