इतर मागासवर्गीय   आर्थिक   विकास   महामंडळाकडून पात्र लाभार्थ्यांची होणारी फसवणूक थांबविण्याची   मागणी   येथील   बहुजन   स्वराज   महासंघाचे अध्यक्ष   प्रमोद   नाथेकर यांनी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांकडे केली आहे.
नाथेकर यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. महामंडळाच्या माध्यमातून ३४६ जाती-उपजातींच्या आर्थिक उन्नतीसाठी पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात, परंतु महामंडळाच्या कार्यालयात योजनांसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. महामंडळाच्या माहिती पत्रकात बीज भांडवल, सूक्ष्म पतपुरवठा, महिला समृद्धी, स्वर्णिम, स्वयंसक्षम कर्ज योजना, मुदत कर्ज, शैक्षणिक कर्ज योजनांची सखोल माहिती दिली आहे, पण प्रत्यक्षात संपर्क साधल्यावर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अर्ज शिल्लक नाही, फक्त एक-दोन कर्ज योजना सुरू असल्याचे सांगितले जाते.
महामंडळाकडून गरजूंची फसवणूक होत असून त्यांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी महामंडळाच्या अध्यक्षांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी नाथेकर यांनी केली आहे.