शाळा-महाविद्यालये सुरू होण्यास आता आठवडा उरला असल्याने परगावी गेलेल्या मुंबईकरांना आणि मुंबईत आलेल्या पाहुण्यांना परतीचे वेध लागले असून त्यासाठी रेल्वेचे तात्काळ आरक्षण ऑनलाइन काढताना मात्र त्यांची दमछाक होत आहे. ऑनलाइन आरक्षणासाठीच्या ‘लॉग इन’लाच अर्धा ते पाऊण तास उशीर लागतो आणि अखेरीस ‘वेटिंग लिस्ट’च नशिबी येते. पण त्याचवेळी एजंटांना मात्र अवघ्या पाच मिनिटांत ऑनलाइन तात्काळ मिळत आहे. परिणामी तात्काळ तिकिटासाठी माणशी १५० ते २०० रुपयांचा भरुदड प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे ऑनलाइन तात्काळ आरक्षणही एजंटांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे.
रेल्वेचे तात्काळ आरक्षण सकाळी आठ वाजता सुरू होत असले, तरी ऑनलाइन तात्काळ आरक्षण सकाळी दहा वाजता सुरू होते. पूर्वी पाच-दहा मिनिटांत तिकीट काढून व्हायचे. पण आता आयत्यावेळी रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी तात्काळ आरक्षणासाठी ऑनलाइन यंत्रणेचा आधार घेणाऱ्यांना मात्र अत्यंत वाईट अनुभव येत आहे. ‘लॉग इन’ होण्यासाठीच तब्बल अर्धा ते पाऊण तास लागत आहे. त्यानंतर ६०-७० तिकिटे शिल्लक असली तरी प्रवाशांचे तपशील टाकून ऑनलाइन पैसे भरण्यापर्यंतचा टप्पा गाठेपर्यंत पुन्हा एकदा संगणकाच्या पडद्यावर तो ‘कुप्रसिद्ध डमरू’ दिसू लागतो. पुन्हा पंधरा-वीस मिनिटे गेल्यानंतर ‘प्रतीक्षा यादी’ (वेटिंग लिस्ट) झळकते. त्यामुळे अनेकांना प्रवासाचा दिवस पुढे ढकलावा लागत आहे. त्याचवेळी एजंटांना फोन केला तर ते मात्र अवघ्या पाच मिनिटांत ही मंडळी ऑनलाइन तात्काळ आरक्षण यंत्रणेचाच वापर करून आरक्षित तिकीट हाती ठेवतात. पण त्यासाठी तात्काळच्या अतिरिक्त शुल्कासोबतच एजंटांचे शुल्क म्हणून माणशी १५० ते २०० रुपयांचा भरुदड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ऑनलाइन आरक्षणाही एजंटांचा आसरा घ्यावा लागणार असेल तर त्या यंत्रणेला अर्थच काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

7